Ahmednagar Politics : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकरी हिताबरोबरच जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन अनेक पाझरतलावांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच नव्याने काही साठवण बंधारे करण्यात आले, या कामाचे फलित म्हणून आज अनेक पाझर तलावांमध्ये यावर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याची चांगल्यापैकी आवक झाली.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने फलदायी ठरले असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील पाझरतलाव दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आ. तनपुरे यांच्या प्रयत्नांतून व माजी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून कोल्हार, ता. पाथर्डी येथील तलाव दुरुस्तीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
यावर्षी झालेल्या पावसामुळे हा तलाव निम्म्याहून अधिक भरल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सोमवारी आ. तनपुरे यांच्या हस्ते या तलावातील पाण्याचे पूजन करण्यात आले. या वेळी आ. तनपुरे म्हणाले की, राहुरी मतदारसंघातील अनेक पाझरतलाव १९७२ च्या काळातील असून, यापैकी अनेक पाझरतलावांना गळती लागलेली आहे.
शेतीचे सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून तलावाची गळती बंद करण्यासाठी व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. शिराळ, तिसगाव, भोसे, लोहसर, खांडगाव, सातवड, करंजी, मिरी, परिसरातील अनेक गावांमध्ये नवीन बंधारे बांधण्यात आले तर काही बंधाऱ्यांतील गाळ काढून त्यांची पाण्याची साठवणक्षमता वाढवण्यात आली.
पाणी आडवा, पाणी जिरवा, ही मोहीम खऱ्या अर्थाने राहुरी मतदारसंघात राबवण्यात आली. डोंगरपट्टयात झालेल्या पावसामुळे पाझरतलाव व बंधाऱ्यांमध्ये पाणी आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरीहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. जलपूजनप्रसंगी मा. पं.स. सदस्य राहुल गवळी,
युवानेते विजय पालवे, अरुण पालवे, सरपंच रवींद्र मुळे, महादेव पालवे गुरुजी, सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, शर्मा पालवे, सोपान पालवे आप्पा गर्जे, संदिप पालवे, ईश्वर पालवे, नवनाथ पालवे, देविदास नेटके, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष पालवे, नानासाहेब डमाळे, धनाजी गर्जे, पिनु मुळे, जगननाथ लोंढे,
अमोल घोरपडे, किशोर पालवे, रमेश पालवे, उध्वव गिते, सतीश पालवे, भाऊसाहेब पालवे मेजर, नवनाथ गिते, सागर डमाळे, आजिनाथ पालवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.