Ahmednagar News : पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा तारखा जाहीर करणार असा अंदाज आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असे संकेत दिले आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. दोन्ही गटांकडून बंद दाराआड उमेदवारांच्या नावावर खलबत्त सुरू असल्याचे समजतं आहे.
दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते प्रत्यक्षात बॅटल फिल्डवर उतरल्याचे दिसत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा राहता तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आगामी विधानसभेची मोठी जबाबदारी राहणार आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून राहता तालुक्यातील विविध गावातील गणेश मंडळांना भेटी दिल्या आहेत. या गावभेटीत त्यांनी युवकांसोबत अन महिलांसोबत विशेष संवाद साधला आहे. या संवादामधून त्यांनी शासनाच्या विविध विकास कामांचा अन योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतलाय.
एवढेच नाही तर यावेळी तालुक्यातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यांनी ओव्हर फ्लो चे पाणी कालव्यांना सोडण्याचे महत्त्वपूर्ण आदेश देखील निर्गमित केलेत. या निर्णयामुळे तालुक्यातील लाभक्षेत्रातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. शेवटच्या गावापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी विखे यांनी आपल्या यंत्रणेचा या ठिकाणी वापर केला आहे.
ज्या ठिकाणी अडचण येत आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून अडचण दूर केली जात आहे. या गाव भेटी दरम्यान महिलांशी संवाद साधताना नामदार विखे पाटील हे लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेत की नाही याचीही विचारपूस करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे विखे यांना महिलांकडून चांगला उत्साही आणि सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.
याशिवाय विखे यांच्या संकल्पनेतून, पाठपुराव्यातून आणि प्रयत्नातून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी युवा प्रशिक्षण कौशल्य योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा युवकांनी अधिक लाभ घ्यावा असे आवाहनही केले जात आहे. या योजनेतून युवकांना 37 प्रकारचे कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मानधन देखील पात्र युवकांना दिले जाणार आहे. ही योजना जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला कशी चालना देईल तसेच ही योजना युवकांसाठी कशी फायदेशीर ठरेल याची देखील सखोल माहिती दिली जात आहे. तरुण वर्ग देखील याला चांगला प्रतिसाद देत आहेत हे विशेष. यासोबतच या गावभेटीतून ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची देखील उकल केली जात आहे.
ग्रामस्थांचे सर्वच प्रश्न ऐकून ते प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकंदरीत ऐन गणेशोत्सवाच्या काळात नामदार विखे पाटील यांनी हा गाव भेटीचा कार्यक्रम सुरू केला असल्याने गणेशोत्सवाचा हा आनंददायी पर्व विकास प्रक्रिया सोबत देखील जोडला गेला आहे. या गावभेटीला ग्रामस्थांकडून जबरदस्त प्रतिसाद देखील मिळतोय हे विशेष.