Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आता शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत देखील चांगले यश मिळणार अशी आशा आहे. शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मध्ये मोठे यश मिळवले आहे.
यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर कडे विशेष लक्ष आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघाकडे पवार यांचे लक्ष असून जिल्ह्यातील आठ मतदारसंघात शरद पवार यांचे म्होरके खिंड लढवणार आहेत.
महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने नगर जिल्ह्यातील आठ जागांवर दावा ठोकला आहे. पक्षाचे नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाने जिल्ह्यातील आठ जागांवर दावा सांगितला आहे.
तसेच, जे लोक पक्षाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत त्या लोकांची सोमवारी मुलाखत घेतली जाईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. ही मुलाखत पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
शेवगाव पाथर्डी, राहुरी, अकोले, कोपरगाव, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, नेवासा, शिर्डी या 10 मतदारसंघासाठी इच्छुक असणाऱ्या 22 उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यासाठी इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज सादर केला आहे.
मात्र राहुरी आणि कर्जत जामखेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे. अकोले मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून अमित भांगरे व मधुकर तळपाडे यांचे अर्ज आले आहेत दुसरीकडे येथील पिचड पिता पुत्र हे शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत.
माजी आमदार चंद्रशेखर घुले हे सुद्धा शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत मात्र त्यांच्या बाबत पक्षाने अजून निर्णय घेतलेला नसल्याची माहिती फाळके यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघाबाबतही भाष्य केले.
फाळके यांना माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत टोकले असता त्यांनी कोतकर यांना लोक स्वीकारतील का? त्यांना निवडणूक लढवता येतील का असे प्रश्न असल्याचे म्हटले आहे.
तसेच, शेवगाव पाथर्डी मधून प्रतापराव ढाकणे, राहुरी मधून प्राजक्त तनपुरे आणि कर्जत जामखेड मधून रोहित पवार यांची उमेदवारी फिक्स असल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी शिर्डीची जागा काँग्रेसने आम्हाला सोडली तर आम्ही या ठिकाणी एक तुल्यबळ उमेदवार देऊ असेही म्हटले आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार
अकोले : अमित भांगरे, मधुकर तळपाडे
कोपरगाव : दिलीप लासुरे, संदीप वर्षे
शिर्डी : रणजीत नानासाहेब बोठे, अॅड. नारायणराव ज्ञानेश्वर कार्ले
नेवासा : डॉ. वैभव सुखदेव शेटे
शेवगाव-पाथर्डी : प्रताप ढाकणे, विद्या भाऊसाहेब गाडेकर
राहुरी : आमदार प्राजक्त तनपुरे
पारनेर : राणी नीलेश लंके, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखेडे
अहमदनगर शहर : डॉ. अनिल आठरे, अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी
श्रीगोंदा : बाबासाहेब भोस, राहुल जगताप, निवास श्रीधर नाईक, अण्णासाहेब शेलार
कर्जत-जामखेड : रोहित पवार