Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्या आधीच भारतीय जनता पक्षासाठी अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे पिता पुत्र पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या मूडमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर भाजपात इनकमिंग झाले.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष काशीद आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील राळेभात यांनी हाती कमळ घेत महाविकास आघाडीला धक्का दिला. कर्जत जामखेडमध्ये महाविकास आघाडीतले दोन बडे नेते भारतीय जनता पक्षात गेले असल्याने मोठे खिंडार पडले असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
दरम्यान या चर्चा ताज्या असतानाच आता भारतीय जनता पक्षाला आउटगोइंगचा सामना करावा लागणार असल्याचे दिसत आहे. कारण की, अकोले विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षात असणाऱ्या पिचड पिता पुत्रांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यामुळे पुन्हा एकदा पिचड पिता-पुत्र शरद पवार यांच्या पक्षात जातील आणि हाती तुतारी घेतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित दादांच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे अकोले मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली आहे. या भेटीमुळे पिचड पिता पुत्र पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात जाणार असे चित्र तयार झाले आहे. खरेतर मधुकर पिचड हे आधी राष्ट्रवादीत होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान आता पिचड पिता-पुत्र पुन्हा एकदा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील अशा चर्चांना उधाण आले आहे. यामुळे आता पिचड पिता-पुत्र खरंच घर वापसी करणार का हे पाहण्याजोगे राहणार आहे.
पण, महाविकास आघाडीच्या जागावाटपात अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे जवळपास फिक्स आहे. त्यामुळे पिचडांना त्याठिकाणाहून उमेदवारीची संधी आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किरण लहामटे हे आमदार आहेत.
यामुळे महायुतीत ही जागा अजित पवार गटाला आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता दाट आहे. याचं पार्श्वभूमीवर आता पिचड पिता पुत्र पुन्हा एकदा शरद पवार गटात जातील आणि हाती तुतारी घेऊन वैभव पिचड येथून आमदारकीसाठी उभे राहू शकतात अशा चर्चांनी जोर पकडला आहे.