Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभेची पेरणी सुरु झाली आहे. आता कालच शरद पवार गटाने विधानसभेची तुतारी फुंकली. दरम्यान महायुती देखील कामाला लागली आहे. नुकतीच विखे घराण्यातील एक चेहरा राहुरी विधानसभेतून उभा राहील अशी चर्चा होती.
यात माजी खा. सुजय विखे यांचेही नाव चर्चेत आघाडीवर होते. आता या चर्चेनंतर माजी खा. सदाशिव लोखंडे देखील आमदारकीसाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बूथनिहाय मतदानाची आकडेवारी समोर येताच या हालचाली सुरु झाल्या आहेत.

त्यात खा. लोखंडे त्यांना श्रीरामपूर मधून मताधिक्य मिळाल्याने ते आता श्रीरामपुरात उभे रहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यानुसार त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून लोखंडे यांना साडे अकरा हजारांचे मताधिक्य होते. याच मताधिक्यामुळे लोखंडे यांचा पराभवानंतरही उत्साहन टिकून आहे.
विधानसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आपल्या मुलासाठी अथवा स्वतः ते उमेदवारी करू शकतात. त्यामुळे त्यांनी श्रीरामपुरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये श्रीरामपूरची जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदेसेनेची जागेवर दावेदारी राहील.
भाजप हा येथे मोठा पक्ष असूनही त्यांच्यावर शिंदेसेनेच्या उमेदवाराची जबाबदारी राहील. ऐन लोकसभा निवडणुकीत उध्दवसेनेचे नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द मिळाल्याचा कांबळे यांचा दावा आहे. मात्र, लोखंडे यांच्याशी त्यांना उमेदवारीची स्पर्धा करावी लागू शकते असे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन-तीन दिवसापूर्णी शहरातील काही कट्ट्यावर सकाळी सकाळी हजेरी लावलेली दिसते. बराच वेळ या ठिकाणी लोखंडे हे गप्पा मारत बसले होते. यापूर्वीही ते कधीमधी यायचे.
परंतु लोकसभेत पराभूत झाल्यानंतर पुन्हा त्यांनी कट्ट्यावर हजेरी लावल्याने त्याची चर्चा सुरु झाली. दुसरीकडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कधी सकाळी तर कधी संध्याकाळी शहरातील वेगवेगळ्या कट्ट्यांवर हजेरी लावून गप्पात रंगलेले दिसतात.