Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. म्हणून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महायुती कडून भाजपाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे.
महायुतीकडून ही जागा भाजपाला सुटली तर येथून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते असे बोलले जात आहे. पण भाजपामध्ये उमेदवारीवरून दोन गट तयार झाले आहेत. मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी इथला उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे.
यामुळे भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पाथर्डीमध्ये निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आमदार राजळे विरोधकांना एकत्र करत या निवडणुकीत पक्षाने उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे.
यामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या निर्धार मेळाव्यात गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे यांनी आमदार राजळे या आमच्या बहिणी प्रमाणे आहेत, त्या दोन वेळेस आमदार झाल्या आहेत. आता त्यांनी थांबून आपल्या भावांचा विचार करावा असे म्हटले आहे.
दौंड यांनी आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून आमच्या उमेदवारीबाबत विचार होईल अशी आशा व्यक्त करत जर पक्षाने तिकीट दिले नाही तर त्याबाबतही विचार करू असा इशाराच यावेळी दिला आहे.
पुढे बोलताना दौंड यांनी आम्ही भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत यामुळे निवडणुकीत आम्ही पक्षाचेच काम करणार आहोत मात्र जर उमेदवार बदलला नाही तर जनता विद्यमान लोकप्रतिनिधीला पराभूत करेल असा दावा केला आहे. यामुळे उमेदवारीवरून मतदार संघात दोन गट तयार झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेच कारण आहे की यंदाची निवडणूक राजळे यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक ठरणार आहे. विरोधकांपेक्षा राजळे यांना स्व पक्षातूनच मोठा विरोध होत असल्याने यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार का याबाबतही आता शंका उपस्थित होऊ लागली आहे.
यामुळे महायुतीकडून यावेळी शेवगाव पाथर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.