Ahmednagar Politics : सहकाराची पंढरी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच नगर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून खलबत्त सुरू आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील नगर शहर, श्रीगोंदे आणि पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष इच्छुक असल्याने आघाडी पुढे जागा वाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. या तिन्ही जागांसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट इच्छुक असल्याने या तिन्ही जागांवर आघाडी कडून कोणत्या पक्षांचे उमेदवार उतरणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
या जागांसाठी तीनही घटक पक्ष आग्रही आहेत, अन त्यातल्या त्यात आता घटक पक्षांकडून बंडखोरीची भाषा सुरू झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीत सारंचं आलबेल नाही हे स्पष्ट होते. या तिन्ही मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसात तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
तिन्ही पक्षातील नेतेमंडळी दौऱ्यावेळी आपल्या पक्षातील इच्छुकांना जागा आपल्यालाच मिळणार असे म्हणून आश्वासन देत आहे. खरे तर या तिन्ही जागावाटपात शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे पवार साहेबांकडे स्वपक्षातील इच्छुकांसमवेतच काँग्रेस आणि ठाकरे गटातील इच्छुक देखील धाव घेत आहेत.
यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर गेल्यावेळी येथून संग्राम भैया जगताप निवडून आले होते. सध्या ते अजितदादांसमवेत आहेत. दुसरीकडे शरद पवार गटात नगर शहर मधून सध्या तरी कोणीच तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस या जागेसाठी आग्रही बनले आहे.
गेल्यावेळी श्रीगोंदे येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडी कडून या जागेवरून निवडणूक लढवलेले किरण काळे यावेळी काँग्रेसकडून नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.
पारनेर बाबत बोलायचं झालं तर गेल्यावेळी निलेश लंके येथून निवडून आले होते. ते सध्या नगर दक्षिणचे खासदार आहेत. शरद पवार गटाकडून उभे राहत त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे पारनेरची जागा निलेश लंके यांच्या पसंतीच्या उमेदवारालाच मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लंके जो उमेदवार देतील तो मान्य असेल असे सूचक विधान केले आहे. म्हणून यावेळी पारनेर मधून निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा आहेत.
मात्र या जागेसाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आग्रही आहेत. जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी ही जागा मिळाली नाही तर थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर गेल्यावेळी घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीकडून नशीब आजमावले होते.
यंदाही ते या जागेसाठी इच्छुक असून काँग्रेस कडून उमेदवारी मागत आहेत. मात्र ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांना खासदार संजय राऊत यांनी तिकीट देऊ असे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे या तिन्ही जागांसाठी महाविकास आघाडी कडून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला आहे.