Ahmednagar Politics : पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे परिचित आहेत. त्यांचा कामाचा, कामे करण्याचा हातखंडा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दरम्यान आता त्यांनी आणखी एका प्रश्नाला हात घातला असून त्यासाठी त्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेतली आहे.
जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या उवर्रीत कामांसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.
निळवंडे धरणाच्या सद्यस्थितीसह धरणासाठी राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. धरणाचे काम कालव्यांसह पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने ५,१७७ कोटी रुपये खर्चास मंजूरी दिल्याने कालव्यांची काम मार्गी लागत आहेत,
मात्र लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी आवश्यक कामांसाठी अधिक निधी मिळण्याची गरज आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
निळवंडे प्रकल्प पूर्ततेकरीता केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर उचित कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, जलशक्ती मंत्रालयाने निधी उपलब्ध करावा,
अशी मागणी मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. निळवंडेचे पाणी कालव्यांमधून लाभक्षेत्रात पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रथम चाचणी घेण्यात आली. यानंतर उजव्या व डाव्या कालव्यातून आवर्तन सोडले होते.
याचा मोठा दिलासा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आता होत आहे. राज्यासह केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाचा निधी उपलब्ध झाल्यास कालव्यांची उर्वरित कामे निर्धारित वेळेत मार्गी लागतील, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी पाटील यांच्याकडे व्यक्त केला.