Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत दिसलेला थोरात-विखे संघर्ष आता विधानसभेला टोकाला जाईल असे चित्र आहे. संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत दोघेही एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान संगमनेर हा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जाणतो.
तब्बल ४० वर्षांपासून येथे माजी मंत्री आ. थोरातांनी एकहाती वर्चस्व ठेवले आहे. मागील विधानसभेला मोदी लाट असूनही व थोरात हे संगमनेरपेक्षा बाहेरील विधानसभा मतदार संघात फिरत असतानाही ते तेथे विजयी झाले.

आता या निवडणुकांमध्ये माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची खेळी कशी असेल? थोरात यांच्या विरोधात कोण उभा राहील? जाणून घेऊयात याबाबत सुरु असणाऱ्या चर्चा..
आमदार थोरात यांच्याविरोधात चर्चेत असणारी नावे
शिंदेसेनेची ताकद संगमनेरात तुलनेने जास्त दिसत नसल्याने यंदाच्या निवडणुकीत थोरात यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असू शकेल. हा मतदारसंघ भाजपकडे जाईल आणि महसूलमंत्री विखे-पाटील ठरवतील तोच उमेदवार असेल अशी चर्चा आहे.
आमदार थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून अमोल खताळ-पाटील, शिंदे सेनेकडून विठ्ठल घोरपडे आणि इतरही काही नावे चर्चेत आहेत. तसेच राज्यात महाविकास आघाडी आहे. मात्र, या आघाडीतील घटक पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास
उद्धव सेनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची सुद्धा निवडणूक लढविण्याची तयारी आहे, यात तालुकाप्रमुख संजय फड, शहरप्रमुख अप्पा केसेकर यांच्याही नावांची चर्चा आहे.
लोकसभेला संगमनेरमधून थोरातांनाच यश
आताच झालेल्या लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच अर्थात खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनाच आघाडी मिळाल्याचे दिसते. त्यामुळे येथे आ. थोरात यांची ताकद लक्षात येते.
त्यातच आता उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) या तिन्ही पक्षांची मिळून महाविकास आघाडी असल्याने त्यांची ताकद आणखी वाढेल असे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेला या वाढलेल्या ताकदीचा फायदा थोरात यांना होऊ शकतो अशी चर्चा आहे.
विखे पाटील देखील ताकद दाखवतील
विखे पाटील यांनी पालकमंत्री झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात थोरात यांच्याविरुद्ध अनेक मेळावे घेतले आहेत. तेथे त्यांनी आपली ताकद व कार्यकर्ते वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचीही तेथे ताकद आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये विखे पाटील देखील ताकद दाखवतील व आ. थोरात यांना घेरण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.