‘माजी सरपंचाइतकीच माझी ताकद राहिलीये..’, भर सभेत सुजय विखेंचे वक्तव्य, अजित पवार गटाचाही बहिष्कार..

Published on -

Ahmednagar Politics :  आता मी माजी खासदार झालो आहे. माजी सरपंचाएवढीच माझी राजकीय ताकद राहिली आहे. त्यामुळे निवेदने देण्यापलीकडे आपण मोठी कामे करू शकत नाही.

त्यामुळे फारतर पोलिस हवालदार, तलाठी यांच्याकडील कामे करू शकतो, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप पदाधिकारी व विखे समर्थकही काहीसे गोंधळून गेले.

एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देता आला तरी खासदारकीपेक्षा तो माझ्यासाठी जास्त मोलाचा आहे, असे विखे म्हणाले.

श्रीरामपुरातील पालिकेच्या थत्ते मैदानावर गुरुवारी शेती महामंडळाची जमीन विनामूल्य वर्ग एक करून शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्यात आले. डॉ. सुजय विखे पुढे बोलताना म्हणाले,

साडेसात वर्षे महसूलमंत्रीपद उपभोगणाऱ्यांनी श्रीरामपूरातील खंडकरी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. उलट जे २० वर्षांत होऊ शकले नाही, ते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दाखवले, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी विनामूल्य वर्ग १ केल्या,

अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली. महायुतीच्या वतीने महसूलमंत्री, तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

यावेळी श्रीरामपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन, तसेच ७.११ कोटींच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभात डॉ. सुजय विखे हे बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बहिष्कार
१७४ कोर्टीच्या पाणीयोजनेचा ठराव अनुराधा आदिक नगराध्यक्ष असताना झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट सरकारमध्ये आहे. त्यांच्यासह माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवसेना गटही महायुतीत आहे.

मात्र, या दोघांचीही नावे जाणीवपूर्वक टाळली गेली. काही दिवसापूर्वी संजय गांधी समितीची रचना झाली. लाडकी बहीण योजनेची समिती गठित केली, मात्र राष्ट्रवादीच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याला त्यात स्थान दिले नाही.

त्यामुळे भाजप व प्रशासनाकडून युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

विधानसभेला महायुतीचा आमदार
लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथून महायुतीचा उमेदवार विजयी होईल, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News