खा. निलेश लंके यांना आता थेट मंत्री गडकरींची साथ ! ‘रस्ता’ सूकर होणार, ‘हा’ मोठा शब्द

Ahmednagar Politics : खासदार नीलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेताच त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरवात केली. त्यांनी सुरवातीलाच एका मोठ्या मुद्द्यास हात घालत थेट मंत्री नितीन गडकरी यांची देखील साथ मिळवलीय.

अहमदनगरमधील नेहमीच चर्चेत राहिलेला नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्नास त्यांनी हात घातलाय. या रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली.

याबाबत जाणून घेत त्यांनी थेट या रखडलेल्या कामासंदर्भात पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती खा. लंके यांनी दिली. त्याचप्रमाणे, खासदार लंके यांना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी माझी नेहमी मदत राहील, अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी या वेळी दिली.

माझ्या खात्याअंतर्गत येणाऱ्या कामांचे प्रस्ताव सादर करा, त्यास प्राधान्याने मंजुरी देण्याची ग्वाही त्यांनी दिली, अशी माहिती खा. लंके यांनी दिली. नगर-मनमाड तसेच नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खा. लंके यांनी मागील वर्षी उपोषण केले होते

. त्या वेळी महाविकास आघाडीचे तत्कालीन नेते अजित पवार यांनी शिष्टाई करीत हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. त्या वेळी पवार यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून लंके यांच्या आंदोलनावर तोडगा काढला होता.

गडकरी यांनी नगर-पाथर्डी रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली होती. ते काम सुरू होऊन पूर्णही झाले. आता नगर-मनमाड रस्त्याचेही काम सुरू झाले मात्र ते पुन्हा थंडावल्याने नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, खा. नीलेश लंके संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी गेले, त्या वेळी नितीन गडकरी यांची भेट झाली होती.

या भेटीदरम्यान नगर-मनमाड रस्त्याच्या कामाविषयी निलेश लंके यांनी व्यथा मांडली. गडकरी यांनी कार्यालयात येऊन निवेदन देण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार त्यांनी निवेदन देखील दिले आहे. या रस्त्यावर अनेक प्रवाशांचे बळी गेल्याचे लंके यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात व हे याच मार्गाने जात असल्याने त्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतोय असे सांगितले. त्यावर गडकरी यांनी पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना संबंधिताना दिल्या. या बैठकीस खा. लंके हेदेखील उपस्थित राहणार आहेत.