Ahmednagar Politics : राज्याच्या महायुती सरकारने महिला भगिनींसाठी महत्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली. गोरगरीब, गरजु महिलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या या योजनेची विरोधी पक्षांनी सुरुवातीला खिल्ली उडविली;
पंरतु या योजनेची व्यापकता व महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद पाहाता विरोधी पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांनीही याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. मात्र आता जाहीरातबाजी करताना माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरेंनी किमान त्या नेत्यांचा फोटो वापरायला हवा होता, अशी टीका भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकात बानकर यांनी म्हटले आहे की, राहुरीत महाविकास आघाडीचे आमदार तनपुरे यांनी कार्यकर्त्यांमार्फत सोशल मीडीया, प्लेक्सद्वारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आवाहन केले; पण ज्यांनी ही योजना आणली, त्या सरकारचा तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा साधा फोटोही टाकला नाही.
याचा त्यांना सोईस्कर विसर पडला. या योजनेबद्दल शासनाचे जाहीर आभार मानून प्लेक्स, सोशल मिडीयावर महायुती सरकारचे अभिनंदन करावे तसेच महायुतीच्या नेत्यांचे फोटो टाकावेत. दुसऱ्यांनी आणलेल्या योजनेचा स्वतःच्या राजकीय फायदयासाठी वापर करुन आपल्या सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करु नये. अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहिर निषेध करतो.
सुरुवातीला महिलांचा बुद्धीभेद करत ही योजना फसवी आहे, मानधन मिळणार नाही, हा फक्त निवडणुकीसाठी सरकारचा फार्स आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक महिला भगिनीचे फॉर्म चुकीचे भरले आहेत.
जेनेकरुन हे अर्ज बाद होतील व त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे सरकारच्या विरोधात या महिला भगिनीच्या रोष वाढेल. तरी तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी आपला फॉर्म भरताना काळजी घ्यावी.
पत्रकावर माजी चेअरमन उदयसिंह पाटील, नामदेव ढोकणे, न.पा.विरोधी पक्ष नेते दादापाटील सोनवणे, माजी संचालक रविंद्र म्हसे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, युवा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके,
माजी शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, माजी संचालक रावसाहेब तनपुरे, अनिल आढाव, आबासाहेब येवले, उमेश शेळके आदींची नावे आहेत.