Ahmednagar Politics : शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाची लाट आहे. याचे कारण म्हणजे दुधाचे घसरलेले भाव. सध्या दूधउत्पादकांना २७ रुपयांच्या आसपास भाव दुधाला मिळत आहे. त्यामुळे साधा खर्चही यातून निघेनासा झाला आहे. त्यामुळे सध्या शेतकरी संतप्त झालेत.
अहमदनगर जिल्ह्यात तीन तालुक्यांत सध्या दुधाला भाव मिळावेत यासाठी आंदोलने सुरु झालीत. परंतु सध्या शासन या प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे दुग्धविकास मंत्री आहेत. ते देखील सध्या यावर काहीच ऍक्शन घेताना दिसत नाहीत.

त्यामुळे लोकसभेला ज्याप्रमाणे कांदा भाव हा मुद्दा गाजला व याचा फटका विखेंसह महायुतीला बसला तसा आता दूध भाव हा प्रश्न विखे यांच्यासह महायुतीला विधानसभेला घेरू शकतो.
विखे पाटलांचे मौन?
आंतरराष्ट्रीय बाजारातील भुकटी दराचे कारण सांगत खाजगी दूध संघ भाव कमी देतायेत. काही खाजगी दूध संघ येत्या १ जुलैपासून दूध खरेदी दर २५ रुपये देणार असल्याचे काही ठिकाणी चर्चा आहेत. परंतु या सगळ्या स्थितीवर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मात्र मौन बाळगतायेत का अशा चर्चा आहेत.
राज्य शासनाला खाजगी दूध संघावर बंधनं घालता येत नसल्याचे विखे पाटील म्हणाले होते परंतु हे खरं असलं तरी राज्य सरकारला खाजगी दूध संघांचं नियमन करता येते हे देखील खरे आहेच की. त्यामुळे सध्याच्या स्थितीवर विखे पाटलांनी मौन बाळगले असल्याचे शेतकरी बोलतायेत.
अनुदान
मंत्री विखे यांनी दुधाला प्रतिलीटर दर ३४ रुपये दर देऊ असे सांगितले होते. परंतु खाजगी दूध संघानी मात्र भाव दिले नाहीत. त्यावर त्यांनी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.
परंतु त्यात अनेक अटी शर्थी असल्याने अनेकांना अनुदान मिळालेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत फसवणूक झाली अशी भावना निर्माण होऊन जास्त नाराजी निर्माण झाली आहे.
विरोधक एकवटणार
आता दूध दरासाठी विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनाचा इशारा दिला तर लगेच दुसरीकडे खासदार शरद पवार यांनीही दूध उत्पादकांची बैठक घेणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा गाजेल व मंत्री विखेंसह महायुतीला घेरले अशी चित्रे आहेत.