Ahmednagar politics : थोरात-विखे संघर्षात खासदार निलेश लंके यांची भर ; विखे यांच्या अडचणीत वाढ !

Published on -

Ahmednagar politics : थोरात-विखे संघर्ष हा अनेक वर्षांपासून आहे. पण, गत काही वर्षांपासून हा संघर्ष टोकाचा बनला आहे. विखे यांनी संगमनेर तालुक्यात व इतर तालुक्यातही हस्तक्षेप केल्याने विखे विरोधी नेते अस्वस्थ आहेत. या नेत्यांचे नेतृत्व एकप्रकारे थोरात करताना दिसत आहे. थोरात यांनी राहता तालुक्यातील गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या मदतीने थेट विखेंविरोधात पॅनल मैदानात उतरविले. हा विखे यांना पहिला धक्का होता. राहाता बाजार समितीतही थोरात हे विखे यांच्या विरोधात मैदानात उतरले हते.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तर थोरात हे विखेंविरोधात थेटपणे मैदानात उतरले असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. त्यात आता खासदार निलेश लंके यांची देखील भर पडली आहे. त्यामुळे विखे यांनाआगामी काळात कडवा संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीतही नगर व शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नसताना आमदार थोरात यांनी ठाकरे गटाला मताधिक्य दिले.थोरात यांनी लंके यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. आपले अनेक कार्यकर्ते त्यांनी लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी पाठवले होते. विखे यांच्या यंत्रणेला तोडीस तोड देत सक्षम यंत्रणा थोरात यांनी पुरवली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात २००९ पासून सातत्याने युतीचा खासदार निवडून येत होता. यावेळी तेथे युतीचा पराभव होऊन महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले.

अकोले व संगमनेर या दोन तालुक्यांनी दिलेल्या मताधिक्यामुळेच वाकचौरे विजयी झाले. यात थोरात यांचा महत्त्वाचा वाटा आहे. लंके यांच्यासाठी त्यांनी बहुतेक तालुक्यात सभाही घेतल्या. दरम्यान राष्ट्रवादीच्या नगरला झालेल्या रौप्यमहोत्सवी मेळाव्यात जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी थोरात यांचा याबाबत उल्लेख केला. त्यामुळे थोरात यांच्या भूमिकेला आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी व ठाकरे गट महत्त्व देण्याची शक्यता आहे. त्यात लंके देखील त्यांच्या साथीला असल्याने विखे यांना आगामी काळात कडवा संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe