अहमदनगर पॉलिटिक्स : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची भाजपशी सलगी ! काँग्रेस स्वबळावर लढणार ….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- नुकत्याच झालेल्या प्रभाग नऊच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या मंथन बैठकीत आगामी मनपाची निवडणूक स्वबळावर लढवण्याची आवई दिली.(Ahmednagar Politics)

तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपशी सलगी केल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेसची मंथन बैठक कालिका प्राईड येथील पक्ष कार्यालयात झाली. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केल्याबद्दल यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, शहरातील काही नेतेमंडळी एका पक्षात राहून शहरातील सर्वच पक्ष आम्ही चालवतो अशा आविर्भावात आहेत. पोटनिवडणुकीत महाआघाडीचा शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, याची खंत काँग्रेसला आहे. शिवसेना व काँग्रेसचे संबंध चांगले आहेत.

कार्यकर्त्यांच्या भावना काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना कळवल्या जातील. आपल्याला मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे.

भाजपला सत्तेपासून रोखायचे. गत अडीच वर्ष भाजपने शहरात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगली. मात्र, या अभद्र युतीने शहर भकास करून ठेवले, असे काळे यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, निजाम जहागीरदार, डॉ. हनिफ शेख, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष प्रवीण गिते, ॲड. अक्षय कुलट, जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, अरुण धामणे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe