Ahmednagar Politics News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसहित मनसे, वंचित बहुजन आघाडी व इतर अन्य छोट्या पक्षांकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप संदर्भात जोरदार खलबत्त सुरू आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने आपले काही उमेदवार जाहीर सुद्धा केले आहेत. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मधील जागा वाटपाचा गुंथा अजून सुटलेला नाही. सध्या या संदर्भात दोन्ही गटांमध्ये चर्चेचे सत्र सुरू आहे. अशातच मात्र इच्छुक उमेदवारांनी रंगीत तालीम सुरू केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गेल्या काही दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. संगमनेर मधून सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. थोरात यांच्या गावात जाऊनच विखे पाटील यांनी आपल्या मनातील इच्छा जनतेपुढे मांडली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये सध्यातरी थोरात यांना टक्कर देईल असा कोणीच नेता दिसत नाही.
त्यामुळे या जागेवरून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. महत्त्वाचे म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे यांना फुल सपोर्ट दिला आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा थोरात विखे संघर्षाचा नवा अंक सुरू होऊ शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. खरे तर संगमनेर हा थोरात यांचा बालेकिल्ला. येथून थोरात सहज निवडणूक जिंकतात हा आजवरचा इतिहास. दहा-पंधरा वर्षांचा नाही तर तब्बल 40 वर्षांचा इतिहास. पण, जर या जागेवरून सुजय विखे यांनी उमेदवारी घेतली तर यंदाची संगमनेरची विधानसभा निवडणूक हाय व्होल्टेज ठरणार आहे. कारण की दोन्ही नेते तुल्यबळ आहेत.
त्यातल्या त्यात विखे आणि थोरात यांच्यामध्ये फार आधीपासून राजकीय संघर्ष आहे. यामुळे यंदा बाळासाहेब थोरात यांना संगमनेरचा किल्ला शाबूत राखण्यात मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत झाली तर कोण विजयी ठरणार? हे सांगणे कठीण नव्हे तर अशक्य बनणार आहे. परंतु प्रत्यक्षात सुजय विखे हे येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? की हा एक फक्त दबाव तंत्राचा भाग आहे ही गोष्ट अजून तरी स्पष्ट होऊ शकलेली नाही. आगामी काळात मात्र या विधानसभा मतदारसंघाचे चित्र क्लिअर होणार आहे.
कसा आहे थोरात विखे यांचा राजकीय संघर्ष
खरंतर अनेक वर्ष थोरात आणि विखे एकाच गटात होते. विखे भाजपात दाखल होण्याआधी काँग्रेसी होते. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसमध्ये असतानाही विखे आणि थोरात यांच्यात नेहमीच संघर्ष होत होता. दरम्यान 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीची इच्छा उराशी बाळगून असणारे सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपामध्ये सामील झालेत. ते तेथून विजय देखील झालेत. पुढे सुजय विखे पाटील यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील बीजेपी मध्ये आलेत. बीजेपी मध्ये आल्यानंतर त्यांनी सहाव्यांदा शिर्डी विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला.
तेव्हापासून खऱ्या अर्थाने विखे आणि थोरात यांच्या संघर्षाला नवीन धार आणि दिशा मिळाली. वेगवेगळ्या गटात दाखल झाल्यानंतर या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. विखे आणि थोरात नेहमीच एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष ठेवून असतात. दरम्यान श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार थोरात यांनी विवेक कोल्हे यांच्या साह्याने गणेश सहकारी साखर कारखान्यावरील विखे यांची सत्ता उलथली. याच भागातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आणि साई संस्थानच्या कर्मचारी सोसायटी निवडणुकीत थोरात आणि कोल्हे आघाडीने विजयाची मुहूर्तरोढ रोवली.
थोरात आणि कोल्हे यांच्या जोडगोळीने शिर्डी मधील विखे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न देखील केला. यामुळे विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तिखट झाला. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणमधून पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवात विखे यांचे आणखी एक कट्टर राजकीय विरोधक शरदचंद्र पवार साहेब यांचा जेवढा वाटा होता तेवढाच वाटा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही होता. यामुळे हा संघर्ष आणखीचं शिगेला पोहोचला आहे.
विखे थोरात यांचा राजकीय संघर्षाचा नवा अंक लवकरच
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी त्यांना पराभूत केले. मात्र लंके यांच्या विजयात आणि विखे यांच्या पराभवात निलेश लंके यांच्या ऐवजी शरद चंद्र पवार साहेब आणि बाळासाहेब थोरात यांचे योगदान मोठे होते. आता याच गोष्टीचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी संगमनेरातून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे थोरात विखे संघर्षाचा नवा अंक आता सुरू होणार अशी शक्यता आहे. खरे तर थोरात यांची त्यांच्या मतदारसंघात असणारी पकड ही संपूर्ण राज्याला ठाऊक आहे.
ते एक, दोन, तीन, चार, पाच टर्म पासून नाही तर तब्बल 8 टर्म पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अर्थातच 40 वर्ष त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. थोरात यांना संगमनेर मध्ये टक्कर देईल असा तडकफडक नेता सध्या महायुतीकडे नाही. परंतु सुजय विखे पाटील यांच्यात ती धम्मक आहे. जर सुजय विखे संगमनेर मधून विधानसभेसाठी उभे राहिले तर नक्कीच थोरात यांच्यासाठी आपला गड 9व्यांदा शाबूत ठेवण्यात अडचणी येणार आहेत. यामुळे आता जर विखे विरुद्ध थोरात अशी निवडणूक झाली तर कोण जड भरत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्या लढतीबाबत तज्ञ काय म्हणतात?
सुजय विखे यांनी संगमनेरचा गड लढण्याचा निर्धार केला आहे. नगर जिल्ह्यातील राजकारणातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, थोरात हे काँग्रेसचे किंबहुना महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते आणि एक प्रमुख स्टार प्रचारक आहेत. ते अहमदनगर काँग्रेस मधील पहिल्या फळीचे नेते आहेत. विधानसभा निवडणुका लागल्यात की थोरात यांचा संपूर्ण राज्यभर दौरा होणार आहे. विशेषता नगर मधील बारा विधानसभा मतदारसंघात थोरात यांचे दौरे अधिक राहणार आहेत. ते निवडणुकीचा कल चेंज करणारे महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेतृत्व आहे. यामुळे हे नेतृत्व इतर कुठे आपला प्रभाव सोडू नये यासाठी भाजपाकडून सुनियोजित प्लॅनने त्यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवण्यासाठी भाजपाकडून सुजय विखे यांच्या उमेदवारीचा नवा हातखंडा आजमावला जात असल्याच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधान आले आहे.
तसेच, काही तज्ञ असं म्हणतं आहेत की, थोरात संगमनेरात पाय रोवत असल्याने याला काउंटर करण्यासाठी थोरात हे कोल्हे यांच्या मदतीने शिर्डीमध्ये विखे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी विखे विरोधी मंडळी एकत्रित करण्यासाठी थोरात यांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान शिर्डीमध्ये थोरात यांची होत असणारी हीच ढवळाढवळ थांबवण्यासाठी, शिर्डी मधील थोरात यांचा हस्तक्षेप कमी व्हावा यासाठी सुजय विखे यांनी संगमनेरातून थोरात यांना आव्हान देण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सुजय विखे यांच्याकडून थोरात यांच्यावर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे असेही काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तथापि विखे पिता पुत्रांचे हे दबाव तंत्र आहे की खरंच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे पाटील थोरात यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहणार हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरचं स्पष्ट होणार आहे. खरंतर सुरुवातीला सुजय विखे पाटील यांनी राहुरी किंवा संगमनेर या दोन्ही मतदारसंघापैकी एका मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र नंतर सुजय विखे पाटील यांनी राहुरीचा हट्ट सोडला आणि थेट संगमनेरच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. या संदर्भात बोलताना काही राजकीय विश्लेषकांनी सुजय विखे पाटील यांनी राज्यसभा किंवा विधान परिषदेवर दावा सांगण्याआधीच भारतीय जनता पक्षाने संगमनेर मधून सुजय विखे पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचे निर्देश दिले असावेत असा दावा केला आहे.
म्हणून पक्षाचे निर्देश आल्यानंतर लगेचच सुजय विखे पाटील यांनी राहुरी मधील आपला दावा सोडला आणि थेट संगमनेरातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली अशा चर्चा जोर धरत आहेत. आता थोरात विरुद्ध विखे अशी निवडणूक लढवून भाजपाला काय फायदा होणार याबाबत बोलताना राजकीय विश्लेषकांनी जर संगमनेरातून सुजय विखे विजयी झाले तर थोरात यांच्यासाठी हा मोठा धक्का राहिल आणि भाजपासाठी ही एक मोठी उपलब्धी राहणार आहे. तसेच जर समजा या निवडणुकीत विखे हरलेत तर पुढील किमान पाच वर्ष विखे पक्षश्रेष्ठींवर राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी दबाव बनवू शकत नाहीत अशा प्रकारची रणनीती भाजपाने आखली असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच एका बाणात दोन पक्षी मारण्याची भाजपाची रणनीती आहे.