Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यातील लढत प्रचंड गाजली. या लढतीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर विजय मिळवत खासदारकी मिळवली.
दरम्यान निवडणुकीच्या काळातील निवडणूक खर्च आयोगाला सादर करावा लागतो. त्यानुसार दोन्ही उमेदवाराने हा खर्च सादर केला आहे.
नगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराचा अंतिम खर्च प्रशासनाला सादर करण्यात आला. यात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे ८३ लाख ४९ हजार २२७ तर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचा ६५ लाख ४५ हजार २६८ रुपयांचा खर्च सादर करण्यात आला.
विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेवर ३९ लाखांचा खर्च दाखवला आहे. मात्र हा खर्च महायुतीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यात विभागून दाखवला आहे.
तीन वेळा खर्चाचा ताळमेळ दाखवण्यात आला. ४ जुलैला अंतिम खर्चाचा ताळमेळ झाला. यामध्ये डॉ. सुजय विखे ८३ लाख ४९ हजार २२७ तर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचा ६५ लाख ४५ हजार २६८ रुपयांचा खर्च सादर करण्यात आला.
संपत्तीपेक्षा खर्च अधिक
खा. निलेश लंके यांनी आपली एकूण संपत्ती ४५ लाख रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. निवडणुकीत त्यांना त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागल्याचे दिसते. लोकवर्गणीतून निवडणूक लढवीत असल्याचे ते सांगत असत.
खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी शिक्कामोर्तब करून हा हिशोब निवडणूक आयोगाला पाठविला आहे. लोकवर्गणीतून निवडणूक लढवीत असल्याने त्यांना जनतेमधूनच मदत झाली असावी असे म्हटले जात आहे.