Ahmednagar Politics : विखे व कर्डिले यांनी राहुरीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, असे काम चालविले आहे. या माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही.
उलट राहुरी तालुक्यात प्रत्येक संस्थेवर अनेक वर्षे ज्यांची राजकीय सत्ता होती, त्या आमदार तनपुरे यांच्या परीवाराने राहुरी तालुक्यातील अनेक संस्था बंद पाडून खऱ्या अर्थाने राहुरीची बाजारपेठ उद्ध्वस्त केली असल्याची टीका भाजप तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर व प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात बानकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, कारखाना संचालक रवींद्र म्हसे, सर्जेराव घाडगे, अनिल आढाव आदींनी म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरीची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. सुतगिरणी बंद पाडली. मुळा-प्रवरा वीज संस्था घालवली. त्यामुळे असंख्य कामगार देशोधडीला लागले.
त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. याचे उत्तर कोण देईल? याला सर्वस्वी तनपुरे जबाबदार आहेत. तुम्ही २५ वर्षे आमदार होता व आताही आहात. राहुरी बसस्थानक डेपो, ग्रामीण रुग्णालय तुमच्या मंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात का झाले नाही? आज इतर शहरे विकसित होत असताना राहुरी शहर विकसित का झाले नाही ?
राहुरीचे प्रलंबित प्रश्न तुमच्या काळात का सुटले नाहीत ? उलट माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने राहुरी शहराला २९ कोटी रुपयांची पाणीयोजना मंजूर करून घेतली.
१३४ कोटी रुपयांची भुयारी गटारीचा प्रश्न सोडविला आणि आता गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. असे असूनदेखील जागेचा प्रश्न का सुटला नाही? राहुरी कोर्टाजवळ भरपूर मोकळी जागा आहे. तेथे ग्रामीण रुग्णालय करण्यास कोणी अडविले ? विखे-कर्डिले यांनी कोणतेही काम मंजूर करून आणले की जागोजागी प्लेक्स बोर्ड लावुन खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार सुरू आहे.
हे राहुरी तालुक्याची जनता चांगलीच ओळखून आहे. कर्डिलेंनी १० वर्षांत जे केले, ते तुम्हाला या पाच वर्षांत काहीच करता आले नाही. कर्डिले यांनी निळवंडे धरण, विविध रस्ते सुधारणा, राहुरी शहराचे मुलभुत प्रश्न उदा. पाणी योजना, भुयारी गटार, ग्रामीण रुग्णालय कर्डिले-विखे यांनी केले.
राहुरी कारखान्याला बँकेच्या माध्यमातून सहकार्य केले. तुम्ही नगर, पाथर्डीकडे जात नाही का? कर्डिले तुम्हाला तेथे गेल्यावर कधी बाहेरेचे असे म्हणतात का? विखे- कर्डिले यांच्यावर आरोप करून आपला नाकर्तेपणा झाकला जात आहे असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.