Ahmednagar Politics : राहुरीत कर्डिलेंचे गणित बिघडले ! विधानसभेला तनपुरे की कर्डीले? पहा..

Pragati
Published:
tanpure

Ahmednagar Politics : लोकसभेची रणधुमाळी संपली. निलेश लंके यांच्या रूपात महाविकास आघाडीला मोठा चेहरा जिल्ह्यासाठी मिळाला. एकंदरीतच या निवडणुकीत विविध विधानसभा मतदार संघातील मताधिक्याची गणिते पाहता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात विविध आखाडे बांधण्यास सुरवात झाली आहे.

आता राहुरी मतदार संघाचा विचार करता येथे विधानसभेची गणिते काय असतील याची चर्चा आता सुरु झाली आहे. लोकसभेला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नीलेश लंके यांचा दणदणीत विजय आगामी विधानसभेत माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग प्रशस्त करणारा तर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे गणित बिघडवणारा ठरू शकतो, असा मतप्रवाह व्यक्त होऊ लागला आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी (६४), नगर तालुका (२४), पाथर्डी (३८) असे तीन तालुक्यांतील १२६ गावांचा समावेश आहे. मागील विधानसभेला भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे अशी लढत झाली. त्यात, तनपुरे यांनी २३ हजार ३२६ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला.

तर मागील लोकसभेला भाजपचे डॉ. सुजय विखे यांना राहुरी विधानसभा मतदारसंघात ७१८०३ एवढे प्रचंड मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी विधानसभेला कर्डिले यांनी एक लाखांच्या मताधिक्याने विजयाचा दावा केला होता. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये २५ हजार मतदार संख्या वाढलेली असतानाही, माजी खा. डॉ. सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही.

राहुरी मतदारसंघात यंदाच्या लोकसभेला विखेंना ११,९३६ मताधिक्य मिळाले. परंतु, मागील तुलनेत तब्बल ५९,८६७ एवढे मोठे मताधिक्य घटले आहे. प्राजक्त तनपुरे हे राहुरीचे आमदार आहेत. लंके यांना ते मताधिक्य देऊ शकले नाहीत, पण विखे यांचे मताधिक्यही या तालुक्यात घटले हे विचार करण्यासारखे आहे.

मागील निवडणुकीत पाथर्डी व नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये तनपुरेंना कार्यकर्ते नव्हते. त्यांनी पाच वर्षांत प्रत्येक गावात राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारली. त्याचा फायदा दिसू लागला आहे. राहुरी मतदारसंघात यंदाच्या लोकसभेला लंकेंची भिस्त आमदार तनपुरे यांच्यावर होती. तनपुरेंच्या यंत्रणेने लंकेंच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

२०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये २५ हजार मतदार संख्या वाढलेली असतानाही, माजी खा. डॉ. सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही. शहरी भागात विखे व लंके जवळजवळ बरोबरीत राहिले, तर ग्रामीण भागात विखे यांच्यापेक्षा लंके यांचे मताधिक्य वाढले.

आ. प्राजक्त तनपुरे यांनी येथे प्रचार यंत्रणा कामाला लावली. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe