Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी अकोले येथे विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. मात्र त्यांची ही तुतारी अकोले विधानसभेसाठी युवा नेते अमित भांगरे यांच्यासाठी फुंकली जाणार की अन्य कोणासाठी, याबाबत संभ्रम आहे. मेळाव्यातच याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
आता ही शंका उपस्थित करण्यामागे कारणही तसेच आहे. अकोलेमधील पिचड पितापुत्र हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात घरवापसी करतील अशी सध्या जोरदार चर्चा आहे.

२०१४ ला मोदी लाट असतानाही माजी आ. वैभव पिचड एकसंघ राष्ट्रवादी कडून उभे राहून जिंकले होते. परंतु २०१९ ला मात्र ते भाजपमध्ये गेले परंतु तेथील जनतेने मात्र हा पक्ष बदल स्वीकारला नाही व तेथे राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे यांना निवडून दिले. दरम्यान ही देखील शरद पवार या नावाची जादू होती हे देखील नाकारून चालणार नाही.
आमदार किरण लहामटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने येथील जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला मिळेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे तेथे महायुतीत भाजप मध्ये असलेले वैभव पिचड यांचे राजकीय पुनर्वसन होणार की नाही हा प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर पिचड पितापुत्रांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणे हाच एकमेव पर्याय दिसतोय. दिवंगत अशोक भांगरे यांच्या ६१ व्या जयंती सोहळ्यास शरद पवार अकोलेत येत आहेत. या दौऱ्यादरम्यान पिचड कुटुंबाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट मागितली असल्याची चर्चा आहे.
माळ कुणाच्या गळ्यात ?
स्वर्गीय जेष्ठ नेते अशोक भांगरे यांचा ६१ वा जयंती सोहळा व शेतकरी मेळावा खा. पवार यांच्या उपस्थितीत अकोले येथे होत आहे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. दिवंगत अशोक भांगरे तालुक्यात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात होते.
दिवंगत भांगरे यांनी तालुक्यातील सत्ता विरोधी राजकारण जिवंत ठेवले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांच्या विजयात, तसेच दोन वर्षांपूर्वी अगस्ती कारख्यान्याच्या सत्ता परिवर्तनात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
मात्र अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अल्प काळातच त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर पुत्र जिल्हा बँक संचालक अमित भांगरे हे आता राजकीय लढाई लढत आहेत.
अमित भांगरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक प्रमुख नेते डॉ. लहामटे यांच्यासोबत गेले असताना फारसा राजकीय अनुभव नसतानाही अमित भांगरे तालुक्यातील पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
त्यामुळे आता जर पिचड पितापुत्र राष्ट्रवादीत आले तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे आगामी विधानसभेची उमेदवारीची माळ अमित भांगरे यांच्या गळ्यात घालणार की पिचडांच्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.