Ahmednagar Politics : लोकसभेच्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यात शरद पवार गटाचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
त्यांचे सर्व आमदार, पक्षांचे सर्व पदाधिकारी आदींनी एकत्रित एकदिलानेकार्य केल्याने यश मिळले आहे. त्यामुळे आता याचे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे औत्सुक्य साधून सेलिब्रेशन अहमदनगरमध्ये आज (१० जून) केले जाणार आहे.
विधानसभा विजयी निर्धाराची तुतारी फुंकणार
आज या कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयी निर्धाराची तुतारी फुंकली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचा एकत्रित कार्यक्रम होत आहे. पक्षाने निवडणुकीत मोठे यश मिळविल्याने पदाधिकाऱ्यांत नवचैतन्याचे वातावरण आहे.
न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावरील कार्यक्रम नगरसह राज्यातील पक्षबांधणीसाठी महत्त्वाचा ठरेल. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तगडे नियोजन केले आहे. जिल्ह्यात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचा पराभव करणाऱ्या लंके यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम जाणीवपूर्वक घेतला जात आहे.
आगामी विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी मदत होणार आहे. फाळके यांनी आग्रहपूर्वक कार्यक्रमाची मागणी केली. पक्षात फूट पडल्यानंतर चिन्ह अजित पवार गटाकडे गेले असले तरी पक्ष आणि चिन्हावर दावा कायम आहे. त्यामुळे आम्ही हा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम जोरात साजरा करीत आहोत, असे फाळके यांनी सांगितले.
गडाखानंतर थेट लंकेच
काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून खासदार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले नाही. भाजपने आघाडीवर मात करत कमळ फुलविले.
गतवेळीही भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांना पराभूत करून विजय खेचून आणला होता. यावेळीही विखे मोठ्या ताकदीने मैदानात उतरले होते. परंतु महाविकास आघाडीने विखे यांचा वारू रोखत लंकेंना दिल्लीत पोहोचवले. तब्बल २० वर्षांनंतर ही किमया घडली आहे.
जगतापांसह विखेंनाही असेल टक्कर
आगामी विधानसभेला शरद पवार गटापुढे जगताप-विखे यांचे आवाहन असणार आहे. त्यामुळे मुद्दामून हा कार्यक्रम नगरमध्ये घेऊन कार्यकर्त्यांत नवा जोश निर्माण करणे व जगतापांसह विखेंनाही टक्कर देता येईल यासाठी आगामी व्यूहरचना करणे हा देखील यामागे उद्देश असावा अशी चर्चा आहे.