Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट युवक जिल्हाध्यक्ष यांनी शेवगाव तालुक्यात केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती दुसऱ्या दिवशी रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी २५ जून रोजी युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष सह कार्याध्यक्ष, सचिव, तीन तालुका उपाध्यक्ष व शहराध्यक्ष अशा नियुक्त्या केल्या होत्या,
मात्र या नियुक्त्यांबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रताप ढाकणे गटाने आक्षेप घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी २६ जून रोजी जिल्हाध्यक्ष निमसे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून या सर्व निवडी स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
तालुक्यात व शहरात इच्छुक कार्यकर्ते जास्त असल्यामुळे काही दिवसातच शेवगाव तालुका व शेवगाव शहर येथील सर्व स्थानिक कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन त्यांची बैठक घेऊन निवडी करण्यात येईल असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले यांनी त्यांचा सत्कार केला, विशेष म्हणजे हे सर्व पदाधिकारी घुले यांच्या गटाचे आहेत मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी उघडपणे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला होता.
निवडणुकीचा निकाल लागताच काही दिवसानंतर घुले गटाच्या कार्यकर्त्यांची शरद पवार गटाच्या पदाधिकारी पदी नियुक्त झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. क्षितिज घुले हे शरद पवार गटात गेले काय ? अशी ही शंका राजकीय पदाधिकारी करत होते कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे क्षितीज घुले हे भाचे आहेत. मात्र प्रताप ढाकणे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून या नियुक्त्यांना हरकत घेतली.
लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांचा जोरदार प्रचार करून विखे यांना मागील लोकसभा निवडणुकीत शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भेटलेली ६० हजार मतांची आघाडी रोखत या लोकसभा निवडणुकीत साडेसात हजार मतापर्यंत आणली.
लोकसभा निवडणुकीत घुले गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम केले त्यांना शरद पवार गटाचे पदाधिकारी म्हणून कशी नियुक्ती मिळू शकते असा थेट आक्षेप ढाकणे गटाच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोंदवला याची प्रतिक्रिया म्हणून दुसऱ्या दिवशी या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे
जिल्हाध्यक्ष निमसे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले दरम्यान आज शुक्रवारी (दि.२८) शेवगाव येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, खासदार निलेश लंके, प्रतापराव ढाकणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होत असून यात नवीन निवडी जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.