अहमदनगर भाजपामध्ये भूकंप ! युवा नेते विवेक कोल्हे शरद पवार गटात सामील होणार ?

Tejas B Shelar
Published:

Ahmednagar Politics Vivek Kolhe : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. खरंतर भारतीय जनता पक्षाचे नगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी कोल्हे समर्थकांनी त्यांना शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे. शिर्डी येथे आयोजित शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण शरद पवार यांनी स्वीकारले देखील आहे. यामुळे सध्या नगरच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी शिजतंय अशा चर्चांना आता वेग आला आहे. कोल्हे महायुतीमधून आउट होतील आणि शरद पवार गटात जातील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. खरंतर विधानसभेची निवडणूक प्रत्यक्षात ऑक्टोबर मध्ये होणार असली तरी देखील या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद दाराआड खलबत सुरू आहे.

उमेदवारांच्या नावांवर देखील जोरदार चर्चा होत आहे. इच्छुक उमेदवार आतापासूनच दंड थोपटत आहेत. दरम्यान या अशा परिस्थितीतच कोल्हे समर्थकांनी शरद पवार यांना शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे आणि ते निमंत्रण पवार यांनी स्वीकारले देखील आहे. यामुळे या घटनेची नगरमध्ये चर्चा होणे स्वाभाविक आहे. शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखतात.

त्यामुळे कोल्हे समर्थकांनी दिलेले निमंत्रण स्वीकारण्यामागे काहीतरी ठोस कारण असेल असे म्हटले जात आहे. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नगर दक्षिणच्या जागेसाठी निलेश लंके यांना गळ टाकला होता तसाच प्रयोग पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत होऊ शकतो अशा चर्चा आहेत. खरे तर नगरच्या राजकारणातला कोल्हे आणि विखे संघर्ष हा काही नवखा नाही.

विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गणेश सहकारी कारखान्यावरून सुरू झालेला आहे. आधी हा कारखाना कोल्हे कुटुंबाच्या अधिपत्याखाली होता. पुढे या कारखान्यावर विखे यांचे वर्चस्व आले. पुढे थोरात व कोल्हे यांनी एकत्रितरित्या हा कारखाना विखे यांच्या अधिपत्याखालून काढून घेतला. खऱ्या अर्थाने विखे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आपल्याच मतदारसंघात विखे यांना मोठा धक्का बसल्याने विखे आणि कोल्हे यांच्यातील वाद वाढतच गेला.

तेव्हापासूनचा हा संघर्ष आजही कायम आहे. विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत. स्नेहलता कोल्हे गेल्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र आशुतोष काळे यांनी त्यांचा पराभव केला. गेल्यावेळी महायुती अस्तित्वात नव्हती. यामुळे पारंपारिक प्रतिस्पर्धी काळे आणि कोल्हे हे वेगवेगळ्या गटात होते.

आता मात्र महायुती तयार झाली आहे आणि यामुळे काळे आणि कोल्हे हे एकाच गटात आले आहेत. साहजिकच आगामी विधानसभा मतदारसंघात कोपरगावची जागा अजितदादा यांच्या गटालाच जाईल आणि या जागेवर पुन्हा एकदा काळे यांनाच उमेदवारी मिळणार असे चित्र आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांची भूमिका काय असणार याकडे राजकारणातील तज्ञ लोकांचे बारीक लक्ष आहे.

दरम्यान, विवेक कोल्हे यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक मतदार संघात नाशिक विभागातून अपक्ष उमेदवारी केली होती. विशेष म्हणजे या उमेदवारीमागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याच्या चर्चा होत्या. पण, विखे यांनी महायुतीचे उमेदवार दराडे यांच्यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली होती आणि विखे यांच्या यंत्रणेने पुन्हा एकदा दराडे यांच्यासाठी चांगली कामगिरी केली.

शिक्षक मतदार संघात कोल्हे यांचा पराभव झाला असल्याने, आगामी विधानसभा निवडणुकीत कोपरगावची जागा अजितदादा यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने विवेक कोल्हे महायुती मधून आऊट होणार का? विधानसभा निवडणुकीआधी कोल्हे यांची भूमिका काय असणार असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे कोपरगावच्या जागेवर महाविकास आघाडी कडून शरद पवार गटातील उमेदवार उभे राहतील अशी दाट शक्यता आहे. मात्र शरद पवार गटाकडे या जागेसाठी दुसरा सक्षम उमेदवार दिसत नाही.

यामुळे ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना तिकीट देऊन शरद पवार यांनी गुगली टाकली होती तशीच गुगली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही टाकली जाईल आणि कोल्हे यांना आपल्याकडे खेचून शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांना कोल्हे समर्थकांनी शिर्डी येथे नियोजित शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार यांना आमंत्रण दिल्यामुळे आणि ते आमंत्रण पवार यांनी स्वीकारल्यामुळे अधिक बळ मिळाले आहे. यामुळे आता कोल्हे यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe