शिर्डीत विखे पाटलांविरोधात कोण उभा राहील? आ.थोरातांचे मोठे प्लॅनिंग? ‘त्या’ दोन यंत्रणा ठरतील विखेंची डोकेदुखी 

Ahmednagar Politics : विधानसभेची प्लॅनिंग आता सर्वच पक्षांकडून सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आता सर्वच मातब्बर तयारीला लागले आहेत. दरम्यान जिल्ह्यात लक्षवेधी ठरणारी जागा म्हणजे शिर्डी. येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी पकड असून ते या मतदारसंघात उभे राहतील.

परंतु यावेळी येथेच जनतेचे जास्त लक्ष असेल याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत विखे कुटुंबियांना बसलेला धक्का. लोकसभेला खा. सुजय विखे पाटील यांचा पराजय झाला. तसेच शिर्डीमधून विरोधी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळालेले मताधिक्य. त्यामुळे आता येथे विखे पाटलांविरोधात कोण उभा राहील? आ. बाळासाहेब थोरातांचे काय प्लॅनिंग असेल ? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

दिवंगत भाऊसाहेब थोरात व दिवंगत बाळासाहेब विखे हे जुने एकमेकांचे विरोधक असले तरी त्यांच्यात टोकाचे राजकारण नव्हते. आता मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

विखे यांनी संगमनेर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली तर थोरात यांनी शिर्डी मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हा संघर्ष अधिक गडद केला. थोरात यांनी गणेश सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर शिर्डी संस्थान को- ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये विखे यांचे दोन्ही पॅनल पराभूत झाले. त्यामुळे आता जनतेचे शिर्डी विधानसभेवर लक्ष असेल.

 ही नावे चर्चेत 
कृषिभूषण प्रभावती घोगरे या काँग्रेसमधून इथे उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय डॉ. राजेंद्र पिपाडा, डॉ. एकनाथ गोंदकर ही मोजकीच नावे चर्चेत आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे.

‘या’ दोन यंत्रणा विखेंची डोकेदुखी ?
कोल्हे व थोरात यांनी एकत्रित येत गणेश सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविली. या कारखान्यात शिर्डी मतदारसंघातील सरासरी ३३ गावे आहेत. त्यामुळे आगामी काळात  गणेश कारखाना यंत्रणा व  थोरात-कोल्हे यंत्रणा या दोन यंत्रणा विखे पाटलांची डोकेदुखी ठरू शकतात अशी चर्चा आहे.