Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये काल (१० जून) राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सव शरद पवार गटाकडून साजरा करण्यात आला. यावेळी आगामी विधानसभेबाबत रणशिंग फुंकण्यात आले. दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबतच्या वक्तव्याने मात्र चर्चांना उधाण आले आहे.
नेमके काय म्हणाले होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील?
माझ्या अध्यक्षपदाबाबत काही लोकं महिने मोजत आहेत. परंतु मला केवळ चारच महिने द्या, मी सरकार आणून दाखवतो. त्यानंतर मी स्वतःच नमस्कार करीन. मात्र, विजयासाठी सर्वांना सोबत काम करावे लागेल. हा विजय सर्वांचा आहे. कोणी एकाने श्रेय घेऊ नये. माझ्याबाबत काही तक्रार असेल, तर थेट साहेबांकडे करा, उगाच ट्विट करून ती जाहीरपणे मांडू नका.

काही चुका असतील तर कानात येऊन सांगा. शरद पवारांकडे तक्रार करा पण जाहीरपणे व समाजमाध्यमांवर बोलणे टाळा. पक्ष कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. शरद पवार देतील ती शिक्षा मी भोगेल असे वक्तव्य त्यांनी केले होते.
रोख कुणाकडे?
आता या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांचा रोख कुणाकडे होता याबाबत चर्चाना उधाण आले आहे. जयंत पाटील यांचा रोख रोहित पवार यांच्याकडे होता अशी चर्चा काही लोक करत आहेत. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर रावेर येथील निकालाबाबत पक्षसंघटनेवर टीका केली होती. त्यामुळे हाच मुद्दा पकडून त्यांनी वरील भाष्य केलं असावं अशी चर्चा आहे.
जयंत पाटील व रोहित पवार यांच्यात बेबनाव?
जयंत पाटील व रोहित पवार यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा सध्या नेहमीच सुरु असतात. त्यात आता जयंत पाटील यांनी जे वरील वक्तव्य केले ते नेमके कुणाला केले हे समजू शकले नसले तरी त्या वक्तव्यानंतर आता जयंत पाटील व रोहित पवार यांच्यात बेबनाव आहे का? त्यांना ते प्रदेशाध्यक्षपदी नको आहेत का? पक्षातील एकी या बेबनावामुळे बिघडत आहे का? आदी गोष्टींची चर्चा सध्या सुरु आहे.
शरद पवारांचे भाजपवर शरसंधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनाधार नसताना त्यांनी सरकार स्थापन केले. प्रचारादरम्यान त्यांनी न शोभणारी भाषा वापरली. मंगळसूत्र, म्हैस चोरून नेईल असे ते म्हणत. भटकती आत्मा अशी माझ्यावर टीका केली. आत्मा अमर असतो. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोंदीवर टीकास्त्र सोडले. पक्षाचे नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, फौजिया खान, शेकापचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील न्यू आर्टस्महाविद्यालयाच्या मैदानावर हा दिमाखदार सोहळा झाला.