Ahmednagar politics : आजी-माजी आमदारांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्याची सर्वच पातळ्यांवर पिछेहाट झाली आहे. त्यांच्या राजकीय मनमानीला चाप लावण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच शिवसंग्राम, बहुजन मुक्ती पक्ष, मराठा सेवा संघ एकत्र येऊन समर्थ व खंबीर पर्याय देणार आहेत.
काँग्रेसचे संभाजी माळवदे, आम् आदमी पार्टीचे अॅड. सादिक शिलेदार, तसेच शिवसंग्रामचे सुरेश शेटे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तालुक्याने विद्यमान लोकप्रतिनिधींसह भाजपला संधी देऊन पाहिली. परंतु दोघांनीही तालुक्यात विकासाऐवजी जिरवा जिरवीचे राजकारण करून जनतेची केविलवाणी अवस्था केल्याचा आरोप यावेळी अॅड. शिलेदार यांनी केला.
जनतेने दुसरा पर्याय म्हणून संधी दिलेल्या ‘माजी’ने या विकास कामाच्या माध्यमांतून हात धुऊन घेतल्याने त्यांनी जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा काँग्रेसच्या माळवदे यांनी केला. काँग्रेस,
आम् आदमी पार्टी, तसेच शिवसंग्राम पक्षाच्या वतीने तालुक्यातून लोकन्याय यात्रा काढण्यात येऊन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसंग्रामचे सुरेश शेटे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत तालुक्याची मुख्य अस्मिता असलेल्या संत ज्ञानेश्वर मंदिर व परिसर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्यक्षात मिळूनही विकास का झाला नाही? असा सवाल केला.
आजी माजी लोकप्रतिनिधींच्या बगलबचांच्या त्रासामुळे या औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळल्याचा धक्कादायक आरोप शेटे यांनी केला. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते राजेंद्र आघाव यांनी आजच्या स्थितीत तालुक्यातील जनता ही दहशतीला बळी पडली आहे.
या दहशतीतून मुक्ती करण्यासाठी तिसरा पर्याय हाच एकमेव आहे. तर बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणपत मोरे यांनी गेल्या दहा वर्षांत दलितांच्या प्रश्नासाठी विद्यमान व माजी लोकप्रतिनिधींनी कोणतेही कार्य केले नाही. त्यामुळे तिसरा पर्याय हाच एकमेव उपाय आहे, असे सांगितले.
बैठकीवेळी भैरवनाथ भारस्कर, काँग्रेसचे संभाजी माळवदे, अंजुम पटेल, मराठा महासंघाचे रावसाहेब घुमरे, समीर सय्यद, सुमित पटारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आता तालुक्यात तिसऱ्या आघाडीच्या एण्ट्रीमुळे चर्चा वाढली आहे.