Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये विधानसभेला ‘पवार फॅक्टर’ चालेल की ‘विखे पॉवर’ ? जगतापांसह ‘या’ सहा आमदारांचे ‘असे’ फिरेल गणित? पहा..

Pragati
Published:
vikhe

 

Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील आजी माजी आमदार आता तयारीला लागले आहेत. दरम्यान लोकसभेला महाविकास आघाडीला विजय मिळवून देण्यात अनेक फॅक्टर कारणीभूत ठरले. परंतु लोकसभा व विधानसभेची गणिते वेगळी असातात.

त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला काय गणिते असतील? शरद पवार यांची जादू २०१९ च्या विधानसभेला चाललीहोती. हीच जादू पुन्हा लोकसभेला दिसली. दरम्यान आता येणाऱ्या विधानसभेला शरद पवारांची जादू पुन्हा चालेल का? की जिल्ह्यात विधानसभेला ‘विखे फॅक्टर’ चालेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकसभेला झालेल्या पराजयामुळे विखे हे दुखावले गेले असल्याने ते विधानसभेला पूर्ण ताकदीनिशी उतरतील अशी चर्चा आहे. भाजपचे तथा महायुतीचे सर्वच आमदार निवडून आणण्याचा ते चंग बांधतील यात शंका नाही.

नगर
नगर मतदार संघाचा जर आपण विचार केला तर सध्या आ. संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवार गटात आहेत. येथे त्यांनी विखे यांना लोकसभेला पूर्ण मदत केली होती. त्यामुळे येथे विखे हे जगतापांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आपली ताकद लावतील. परंतु लोकसभेला शरद पवारांची वाढलेली सहानुभूती व महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्क्यात झालेली वाढ हे मात्र त्यांची डोकेदुखी वाढवणारे ठरेल.

तसेच विधानसभेला अजित पवार गट हा नेमकी काय भूमिका घेणार? स्वातंत्र्य लढणार की भाजपसोबाबत लढणार हे देखील पाहावे लागेल. अजित दादा गट महायुतीसोबत राहिला नाही तर मात्र विखे यांची देखील येथे अडचण होईल. दरम्यान आता नगर शहरात विखे यांची पॉवर, शरद पवार गटाचा फॅक्टर आणि अजित दादांची आगामी वाटचाल यामध्ये जगतापांची आगामी भूमिका ठरेल.

अकोले
मागील विधानसभेला अकोल्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाच करिष्मा येथे दिसून आला होता. परंतु आता तेथे निवडून आलेले आमदार किरण लहामटे हेच अजित पवार गटात आहेत. तसेच तेथील दिग्गज नेते पिचड कुटुंबीयही भाजपसोबत आहे. तसेच उत्तरेतील विशेषतः अकोलेतील राजकारणात विखे यांचे वर्चस्व देखील सर्वश्रुत आहे.

त्यामुळे येथे विखे यांना महायुतीचे बळ जास्त भेटेल. त्यामुळे तेथे आता पुन्हा एकदा या विधानसभेला शरद पवार यांची जादू चालेल का? की विखे यांचे गणित सक्सेस होईल हे आगामी काळ सांगेलच.

कोपरगाव
कोपरागावमध्येही तीच स्थिती आहे. येथे भाजपचे मतदान देखील जास्त आहे. तसेच मागील वेळी भाजपच्या विरोधात निवडून आलेले आ. आशुतोष काळे हे महायुतीसोबत आहेत. तसेच त्यांचे व विखे यांचे राजकीय सख्य लपलेले नाही.

त्यामुळे येथे शरद पवार यांना देखील मोठे कसब लावावे लागेल. दरम्यान येथे असणारे काळे-कोल्हे , विखे-कोल्हे राजकीय वैर याचा फायदा जर पवार यांनी उचलला तरी देखील काही प्राणात चित्र वेगळे दिसेल.

कर्जत-जामखेड
या विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे इच्छुकांची संख्या कर्जत तालुक्यातून सर्वाधिक दिसून येत आहे. जामखेड तालुक्यातून आमदार राम शिंदे वगळता सध्यातरी कोणाचेही नाव पुढे येताना दिसत नाही. महाविकास आघाडीतून विद्यमान आमदार रोहित पवार वगळता इतर नावांची चर्चा दिसून येत नाही.

येथील मतदारसंघावर दावा ठोकण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्याही हालचाली सुरू आहेत. एकंदरीतच येथे महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी जास्त असल्याने तेथे सर्वाना एकनिष्ठ ठेवण्यात महायुतीला कंबर कसावी लागेल तर महाविकास आघाडीचा एकच चेहरा असल्याने त्यांच्यात सुसूत्रता दिसेल.

शेवगाव पाथर्डी
शेवगाव पाथर्डीमध्ये शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे यांचे नाव जवळपास अंतिम असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून सध्या स्टँडिंग आमदार असल्याने मोनिका राजळे यांचे नाव गृहीत धरले जातेय. अजित पवार गटाकडूनही काही इच्छुक येथे आहेत.

येथे लंके यांना मिळालेलं मताधिक्य पाहता शरद पवार गटाची ताकद येथे वाढलेली दिसते. परंतु असे असले तरी विखे यांचे या मतदार संघातील प्राबल्यही मोठे आहे. तसेच या मतदार संघात भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा वर्गही मोठा आहे.

तसेच सध्या महायुतीसोबाबत असल्याची चर्चा असणारे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर यांचे वर्चस्व आहे. ही सगळी ताकद विखे यांना एकत्रित बांधण्यात यश आले तर येथे शरद पवार गटाचेही मोठे कसब लागणार आहे यात शंका नाही.

राहुरी 
राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. येथे लोकसभेच्या मताधिक्याचा विचार करता तनपुरे यांची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसते. अर्थात येथे शरद पवार यांचे देखील व्यक्तिशः राजकीय संबंध या तालुक्याशी आहेत. आगामी विधानसभेला येथून स्वतः विखे यांच्या कुटुंबातील चेहरा येथे उभा राहील अशी चर्चा आहे.

येथे विखे यांचे कौटुंबिक स्नेह असणारे नातेवाईक जास्त प्रमाणात आहेत. तसेच राजकीय पातळीवर देखील आजवर विखे यांनी जातीने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातच आता राहुरी कारखान्याच्या माजी संचालिका स्व. रामदास धुमाळ यांच्या स्नुषा शैलजा धुमाळ यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या राहुरी महिला तालुकाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. म्हणजे महायुतिची ताकद वाढलेली दिसते. त्यामुळे येथे दोन्ही गटालाही जास्तीत जास्त ताकद लावावी लागेल यात शंका नाही.