Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.

यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते बोलत नाहीत, मात्र मागून खूप धुसफूस सुरू आहे. त्यांना फार त्रास होत आहे. हे त्यांना सांगतात की, थांबा, दम काढा, विरोधी पक्षात बसण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वात आपलं काहीतरी बरं चाललं आहे.

असं असलं तरी चांगलं चालावं म्हणून त्यांना २०२४ पर्यंत थांबा म्हणून सांगत आहेत. मार्गदर्शन तर असं सुरू आहे की, या नाराज आमदारांना काही बोलूच दिलं जात नाही. असं बरोबर नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, तुम्ही म्हणाल निधीची उधळण कशी होते. मी १ डिसेंबर २०२२ चा एक जीआर बघितला. नगरविकास विभागाने जीआर काढला की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी १९५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. मीरा-भाईंदर २५५ कोटी रुपयांची मंजुरी दिली, अशा प्रकारे अनेक ठिकाणी निधी दिला आहे.

तसेच ठाण्यात संगीत कारंजे, सुशोभीकरण ५० कोटी, स्मशानभूमीत ५० कोटी, विहिरींची साफसफाई ५० कोटी, डोंगराळ भागात सोलर दिवे बसवणे ५० कोटी रुपये, बस स्टॉप आणि ज्येष्ठ नागरिकांना कट्टा ५० कोटी, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे.