Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने याची चर्चा सुरू आहे. आता याचे पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. यावरून आता राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ‘५० खोके-एकदम ओके’ म्हणत विरोधकांनी हैरान करुन सोडलं. आता हाच फॉर्म्युला शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीवर वापरत आहेत.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपप्रणित शासनाला पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचण्याची संधी सोडली नाही. ५० खोके, नागालँड ओक्के, अशी घोषणा त्यांनी दिली आहे. यामुळे सभागृहात गोंधळ झाला.
असे असताना गुलाबरावांनी घोषणा देताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला. अजित पवार म्हणाले, आज राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. केंद्र सरकार तुमचं आहे. सगळ्या चौकशी यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत.
मग आरोप कसले करता, सरळ चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली, असे अजित पवार म्हणाले. गुलाबरावांनी नागालँडवरुन राष्ट्रवादीला कोडिंत पकडण्याचा प्रयत्न केल्यावर आणि राष्ट्रवादीने ५० खोके घेतले का? असा सवाल केल्यावर अजितदादा विधानसभेत बोलत होते.