Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहे. त्यातच आता जे कधीकाळी एकत्र होते, सोबत होते ते एकमेकांवर संतप्त होत टीका करत आहेत. याचा प्रत्यय शिरूर मध्ये येतोय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निश्चय व्यक्त केला. त्यावर अमोल कोल्हे यांनीही सौम्य, सावध प्रतिक्रिया दिली होती. परंतु आता या वादात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उडी घेतली.
त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. या टीकेला डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की आढळराव पाटील हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. एका वयस्कर नेत्याचा डिजिटल युगाशी काही संबंध नसल्याने त्यांचे
सोशल मीडिया जे कुणी हँडल करते त्यांनी त्यांना माझे फेसबुक पेज दाखवावे त्यावर सर्व कामांची माहिती तिथे मिळेल. ज्येष्ठ नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आशीर्वाद द्यावेत अशी बोचरी टीका त्यांनी केली.
जनाक्रोश मोर्चाला सुरुवात
आज जुन्नर येथून राष्ट्रवादीच्या जनाक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली याचा प्रारंभ झाला. किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीला वंदन करून याची सुरवात झाली. यावेळी खा. कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर टीका केली.
खा. कोल्हे आक्रमक
यावेळी खा. अमोल कोल्हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्याने भाव गडगडले. या बद्दल लोकसभेत आवाज उठवला तर माझे आणि सुप्रिया सुळे यांचे निलंबन केले गेले. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही बोलायचे नाही का? असा सवाल करत लाखोंच्या पोशिंद्यावर जर अन्याय होत असेल तर यावर मोर्चा काढून सरकारला जागे करावे लागेल असे खा. कोल्हे यावेळी म्हणाले.