Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. सत्तेत सहभागी होऊन तीन महिने उलटले तरी पालकमंत्रीपदाचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होत नसल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.
त्यामुळेच मंत्रालयात येऊनही त्यांनी कॅबिनेटला दांडी मारल्याचे समजते. दरम्यान, अजितदादा आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
जुलै महिन्यात राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार ४० हून अधिक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासोबत गेलेल्या ९ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदेही मिळाली. मात्र मंत्रीपदाची शपथ घेऊन तीन महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आलेले नाही
अजित पवार गटाला पुणे, रायगड, सातारा, बीड, नाशिकसह काही प्रमुख जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हवे आहे. मात्र शिंदे याबाबत कोणताही निर्णय घेत नाहीत. याबाबत मागील आठवड्यात अजित पवार यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बंद दाराआड दीड तास चर्चा केली होती.
त्यावेळी अजित पवार यांनी फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करताना आम्ही मोठा धोका पत्करून तुमच्यासोबत सत्तेत सहभागी झालो आहोत. त्यामुळे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या आमच्या पक्षातील नेत्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
दरम्यान, गणेशोत्सवात ‘बिझी’ असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गणपती विसर्जन होताच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी रात्री अडीच तास चर्चा केली होती. त्यावेळी आगामी मंत्रिमंडळ विस्तार तसेच पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. मात्र अजित पवारांना ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हवे ते देण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दाखवली.
खासकरून रायगड आणि सातारा जिल्ह्यांवरून शिंदे- पवार यांच्यात बिनसल्याचे समजते. साताऱ्याचे पालकमंत्रीपद शिंदेंचे निकटवर्तीय शंभूराज देसाई यांच्याकडे आहे, तर रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यास शिंदे गटातील आमदारांचा उघड विरोध असल्याने शिंदेंनी नकार दिल्याचे समजते.