Ajit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर होते. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? असेही अजित पवार म्हणाले.
असे असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अजित पवारांनी जी बाब उपस्थित केली ती गंभीरच आहे. मी त्याच अजिबात समर्थन करणार नाही. आज सभागृहात जो प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो, असे फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, अध्यक्षांनाही विनंती आहे की, एखाद्या दिवशी उशिरापर्यंत कामकाज चालत असेल, तर आधी ऑर्डर ऑफ द डेची असुधारित प्रत पाठवून द्यावी. त्यामुळे सकाळच्या लक्षवेधींचं ब्रिफिंग घेता येईल. याबाबत अध्यक्षांनी निर्देश द्यावेत. काल रात्री एक वाजेपर्यंत सभागृह चाललं.
त्यामुळे ‘ऑर्डर ऑफ द डे’ रात्री एक वाजता निघाला. तो एक वाजता निघत नाही. अध्यक्ष रात्री नऊ किंवा १० वाजता ऑर्डर ऑफ द डे काढतात. त्यानंतर मंत्र्यांना आढावा घ्यावा लागतो. तो आढावा मंत्र्यांनी कधी घ्यायचा हा प्रश्न असतो.
तसेच फडणवीस म्हणाले, अपवादात्मक परिस्थिती सोडता सर्व मंत्री उपस्थित राहतील. यामुळे आता इथून पुढे तरी मंत्री उपस्थित राहणार का हे लवकरच समजेल. सध्या अधिवेशन सुरू आहे. सरकारपुढे अनेक प्रश्न देखील आहेत.