धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या वादात अजित पवारांची उडी ! केले असे विधान

१७ फेब्रुवारी २०२५ नाशिक : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे.वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याने विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे.

सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले,त्यावेळी मी राजीनामा दिला होता. त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनी ठरवावे, असे म्हणत अजित पवारांनी राजीनाम्याचा विषय धनंजय मुंडेंच्या कोर्टात ढकलला आहे.अजित पवार हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नाशिक दौऱ्यावर असून,त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सांगितले आहे की, जी घटना बीडला घडली, ती अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आहे.त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल.कुणालाही सोडले जाणार नाही.मुख्यमंत्र्यांनी त्वरित एसआयटी, सीआयडी नेमली असून,न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे.पण, धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे की, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

अजित पवार पुढे म्हणाले की, २०१० च्या दरम्यान माझ्यावर सिंचनाच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मी राजीनामा दिला होता.कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही.मी स्वच्छ पद्धतीने काम केले होते.मी गेल्या ३४ वर्षांपासून अनेक खाती सांभाळली आहेत.१९९२ सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आले.माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्यात आली.त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटले की,आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत.नंतर मी राजीनामा दिला होता,असे अजित पवारांनी सांगितले.