Ajit Pawar : सध्या राज्यात महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकत्र येत आता राज्यभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून होणार आहे. येथील सभा यशस्वी करण्याची जबाबदारी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देण्यासाठी राज्यभरात संयुक्त सभांची घोषणा केली आहे.
७ ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होतील. या सभांची जबाबदारी प्रत्येक विभागातील महत्त्वाच्या नेत्यावर देण्यात आली आहे. हा नेता शिवसेना, काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस या तीनपैकी कोणत्याही पक्षाचा असला तरीही सर्वांनी मिळून त्या त्या विभागातील सभा यशस्वी करायची आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
तसेच महाविकास आघाडीत फूट पडता कामा नये, असा दमही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज पार पडली. अजित पवार यांनी राज्यातील महत्त्वाच्या 7 सभा कुठे होतील, याची घोषणा केली.
या संयुक्त सभांना अजित पवार, उद्धव ठाकरे तसेच नाना पटोले उपस्थित असतील. यामुळे यावेळी भाजप सरकारवर जोरदार हल्ला करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.