प्रवरा कारखान्यावर व्यक्तिद्वेषातून आरोप, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ- डॉ. सुजय विखे-पाटील

प्रवरा साखर कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे मोठे योगदान आहे. विरोधक केवळ व्यक्तिद्वेषातून आरोप करत असून, त्यांनी कारखान्यासाठी काय योगदान दिले, असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. ते म्हणाले, विरोधकांना पुन्हा धडा शिकवू.

Published on -

Ahilyanagar Politics: लोणी- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. नव्या हंगामात कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण होईल, ज्यामुळे गाळप क्षमता वाढेल आणि कामगार, सभासद यांच्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील. मात्र, केवळ वैयक्तिक द्वेषापोटी कारखान्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जे आरोप करतात, त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी काय योगदान दिले, असा सवाल उपस्थित करत विरोधकांना आतापर्यंत अनेकदा धडा शिकवला आहे आणि यापुढेही त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिला.

प्रवरानगर येथे कारखाना आणि साखर कामगार सभा यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त कामगार सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, सर्व संचालक आणि कामगार उपस्थित होते.

कारखान्यात कामगारांचा मोलाचा वाटा

डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले, प्रवरा कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक संकटात आणि प्रगतीच्या टप्प्यावर कामगारांनी कारखान्याला साथ दिली. त्यांच्या मेहनतीमुळे कारखाना आज सक्षमपणे उभा आहे. “हा सत्कार सोहळा तुमच्यासाठी आनंदाचा असला, तरी माझ्यासाठी वेदनादायी आहे, कारण तुम्ही कारखान्याचा अविभाज्य भाग आहात. सेवानिवृत्तीनंतरही तुम्ही प्रवरेसाठी योगदान देत राहा,” असे आवाहन त्यांनी केले. विखे पाटील कुटुंबाने सहकार चळवळ आणि सामाजिक कार्यात सर्वांना सोबत घेत काम केले आहे, यात कामगारांचा वाटा मोठा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

कारखान्यामुळे अनेक कुटुंबाचा उद्धार

साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी विखे पाटील कुटुंबाने कामगारांची घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांची मुले-मुली शिक्षण घेऊन जागतिक पातळीवर पोहोचली आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी कैलास तांबे आणि संजय मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच कामगार अपघात विमा आणि मयत सभासद विमा योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले. उपाध्यक्ष सतीश ससाणे यांनी आभार मानले.

सहकाराचे खासगीकरण होऊ नये

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सहकाराचे खासगीकरण होऊ नये, यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, आणि तेच कार्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुढे नेत आहेत, असे सांगितले. त्यामुळे प्रवरा कारखाना आज सक्षमपणे उभा आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालय, विळद आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागाचे प्रयत्न

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कामे होत असल्याचे डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सांगितले. निळवंडे धरणाचे पाणी आणि नदीजोड प्रकल्प यांच्या माध्यमातून येत्या काळात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील. या प्रयत्नांमुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News