Maharashtra Politics : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर प्रथमच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. परंतु अजितदादांनी शरद पवार यांच्यासोबत हस्तांदोलन करणे टाळले.
तसेच कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांनी शरद पवार यांच्या पाठीमागील बाजूने व्यासपीठ सोडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरू झालेला काका-पुतण्यामधील बेबनाव कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येण्याची जशी चर्चा रंगली होती, तशीच चर्चा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीची होती.
पवार काका-पुतण्यामध्ये कुठलाही संवाद न झाल्याची चर्चा सभागृहात रंगली होती. टिळक पुरस्काराची वेळ सकाळी ११.४५ ची होती. शरद पवार नेहमीप्रमाणे वेलेन कार्यक्रमस्थली हजर वाले यानंतर १५ मिनिटांनंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे व्यासपीठावर दाखल झाले.
ज्या बाजूने शरद पवार व्यासपीठावर आले, त्याच बाजूने राज्यपाल, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील व्यासपीठावर आले. या सर्वांनी शरद पवार यांच्यासोबत हस्तांदोलन केले.
परंतु अजितदादा विरुद्ध बाजूने व्यासपीठावर येऊन खुर्चीवर बसले. त्यामुळे त्यांना हस्तांदोलन करण्याची वेळच आली नाही. कार्यक्रमात मोदींच्या भाषणाअगोदर पवार साहेबांचे भाषण झाले.
पवार यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केला. पवार साहेबांनी मनात कुठलीही कटुता ठेवली नसली तरी अजितदादांच्या मनात सल कायम असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसले.