१६ जानेवारी २०२५ मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची तडिपारी दरोडा चोरीसाठी नव्हती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी यांच्या एन्काऊंटरमध्ये तडिपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल,असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील भाजप अधिवेशनात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.शरद पवार यांनीही त्याला प्रत्युत्तर देताना अमित शाहांवर खरमरीत टीका केली होती.आता तावडे यांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट करून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अमित शाहांची तडिपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती. दाऊदच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही, हे बहुदा शरद पवार विसरले आहेत.अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्या विषयी देखील हेच म्हटले असते का ? हे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे,असे तावडे म्हणाले.