Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. अहमदनगरमधील राजकीय वातावरण तसे त्या दृष्टीने फिरू लागले आहे. परंतु मागील वर्षभरापासून चर्चेत असणारी नगर दक्षिण अर्थात ‘अहमदनगर’ मतदार संघाची जागा जास्त चर्चेत आहे.
याचे कारण म्हणजे विद्यमान खा. सुजय विखे. विखे घराण्याची राजकीय ताकद सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा आत्मविश्वास असणे साहजिक आहे. परंतु, विखे विरोधक मात्र त्यांना नामोहरम करण्यासाठी नेहमीच संधी शोधत असतात.
विखे विरोधक संधीच्या शोधत
विखे विरोधकांना दक्षिणेत आ. निलेश लंके यांच्या रूपात ती संधी दिसली व विखे विरोधक आ. लंके यांच्या आसपास एकवटले. त्यामुळे आ. निलेश लंके यांच्या खासदारकीची चर्चा सुरु झाली. ते कशा पद्धतीने टक्कर देऊ शकतात किंवा त्यांची वोट बँक आदी गोष्टींचाही ऊहापोह झाला.
परंतु अद्याप आ. लंके यांचे शरद पवार गटात येणे शक्य दिसत नाही त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा थांबलेली दिसते. परंतु आता अहमदनगर मध्ये खा. सुजय विखेंविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
खा. विखेंविरोधात अमित ठाकरे
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात आता खा. विखेंविरोधात अमित ठाकरे अशी लढत होईल अशी चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण असे मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी तशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या मागणित असे म्हटले आहे की, अहमदनगर मतदार संघ हा विकासापासून वंचित आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे कामही असमाधानकारक आहे. सध्या त्यांचे मतदार संघात साखर, डाळ वाटपाचे काम सुरू आहे. त्याचे कार्यक्रम प्रत्येक गावात ते घेत आहे.
परंतू अनेक ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जर अमीत साहेब ठाकरे यांनी ही लोकसभा निवडणूक लढवली तर ते नक्कीच निवडून येतील. तसेच राज ठाकरे यांची विकासाची दूरदृष्टी लक्षात घेता दक्षिण लोकसभा मतदार संघातील मतदार भरघोस मते हे मनसेच्या पारड्यात टाकतील.
त्यामुळे जिल्ह्यात मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढेल. अहमदनगर जिल्हा हा सहकार साखर सम्राटांचा जिल्हा आहे. अनेक दिग्गज नेते येथे होऊन गेले परंतु म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे अमीत ठाकरे यांनी येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण नगर या मतदार संघातून लढवावी अशी मागणी भुतारे यांनी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे तसेच अमीत ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे यांच्या एन्ट्रीने समीकरणे बदलतील
मनसेचे नेते अमित ठाकरे जर अहमदनगर मध्ये उभे राहिले तर काही समीकरणे निश्चितच बदलतील असे म्हटले जात आहे. मनसेचा एक व्होट बँक जिल्ह्यात आहे. तसेच राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संबंध चांगले आहेत.
तसेच एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पहिले जाऊ लागले आहे. त्याकाह्ही फायदा त्यांना होईल. तसेच अहमदनगर मधील जे प्रस्थापित राजकरणी आहेत की जी सोयीनुसार पक्षबदल करतात त्यांनाही याचा फटका बसेल यात शंका नाही.
खा. सुजय विखे यांची पकड मजबूत
खा. सुजय विखे यांनी भरपूर विकासकामे केली आहेत. तसेच राजकीय धुरिणांची एकत्रित मोट बांधत व ती आपल्या जवळ ठेवण्यातही त्यांना यश आल्याचे दिसते. त्यांचा कामाचा सपाटा व त्यांची असणारी लोकप्रियता ही आजही टिकून आहे.
काही किरकोळ घटना वगळता विखे यांचा साखर वाटपाचा कार्यक्रम तसा यशस्वी झाला असे म्हणले तर वावगे ठरू नये. त्यामुळे विखे यांच्या विरोधात कुणीही असले तरी विरोधकांना ही निवडणूक तशी सोपी नाही असे लोक म्हणतात.