श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे.
या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे.

हरिनाम सप्ताहाला भेट
टाकळी लोणार येथील हरिनाम सप्ताहाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी कुकडीच्या पाणीप्रश्नावर ठामपणे आवाज उठवला होता आणि आता त्याच दिशेने ठोस पावले उचलण्याची त्यांची तयारी आहे.
गेल्या आवर्तनात श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांना पुरेसे पाणी मिळाले नाही, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. अनेकांनी लंके यांच्याशी संपर्क साधून पाण्याच्या कमतरतेची तक्रार केली होती. त्यानंतर लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा केला. तरीही हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.
राजकीय रंग देऊ नका
कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही, हा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे. लंके यांनी डिंभे धरणाला कुकडी प्रकल्पाचा कणा मानले आहे, कारण या धरणावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. डिंभे ते माणिकडोह बोगदा ही शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी आहे, जी आतापर्यंत कागदावरच राहिली आहे. या बोगद्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढेल आणि विशेषतः उन्हाळ्यातील टंचाईवर मात करणे शक्य होईल. लंके यांनी या प्रकल्पाला राजकीय रंग न देता शाश्वत उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर, पुणे जिल्ह्यातील काही व्यक्तींकडून या बोगद्याला होणारा विरोध झुगारून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलन उभारणार
लंके यांनी यापूर्वीही जलसंपदा विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन पत्रव्यवहार केला आहे. या बोगद्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मते, हा बोगदा पूर्ण झाल्यास कुकडी प्रकल्पाला अतिरिक्त तीन ते चार टीएमसी पाणी मिळू शकेल, ज्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल.
या आंदोलनासाठी ते पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टाकळी लोणार येथील कार्यक्रमात आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे, कोसेगव्हाणचे उपसरपंच भीमराव नलगे, आप्पासाहेब रोडे, प्रा. संजय लाकुडझोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.