लोकसभेच्या धामधुमीत असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झालेय. ते करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
आज गुरुवारी पहाटे वयाच्या 71 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. राहत्या घरातल्या बाथरुममध्ये ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात ४४ वर्ष काँग्रेसची धुरा वाहणारा निष्ठावान
पी. एन. पाटील यांचे नाव पांडूरंग निवृत्ती पाटील असे असले तरी ते कोल्हापुरात पी. एन. पाटील या नावानेच प्रसिद्ध राहिले. गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख. त्यांनी नुकतेच या लोकसभेला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरमध्ये एक महिना झंझावाती प्रचार केला होता.
आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पी. एन. पाटील यांनी काँग्रेसमधून सुरु केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा काँग्रेसचा कणा म्हणूनच ते एकनिष्ठ राहिले. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली होती. 1978 ते 1985 या काळामध्ये जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी पद त्यांनी सांभाळले. या काळातच त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया भरला गेला.
1986 ते 1990 या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पद भूषवत आपल्या कार्याची चुणूक दाखवली. 1999 ते 2019 अशी 20 वर्ष त्यांनी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी काम करत काँग्रेस वाढवली. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले आहे.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला जातो त्यामागे पी एन पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसला हा मोठा धक्का बसलेला असून कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व गमावले असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कशामुळे झाले निधन
आ. पाटील यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झालेला होता व थकवाही जाणवत होता. रविवारी सकाळी पाटील हे बाथरुममध्ये चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली. मेंदुमध्ये रक्तस्त्राव देखील झालेला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.