अशोक गायकवाडांचा थेट अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Published on -

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाला. या प्रसंगी माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे, आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादीचे नगर शहराध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

अशोकराव गायकवाड यांच्यासोबत प्रा. भीमराव पगारे, सुरेशराव गायकवाड, सुखदेव शिंदे, ल्यूथर गायकवाड यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. गायकवाड यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्याकडे त्यांना राज्यस्तरीय जबाबदारी देण्याची विनंती केली.

या वेळी अशोकराव गायकवाड यांनी आपला निर्धार व्यक्त करताना म्हटले की, “अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार काम करून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला आंबेडकरी चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व मिळाले असून, पक्षाच्या स्थानिक पातळीवरील ताकदीत वाढ होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक प्रभावाचा उपयोग पक्षाला आपली पकड मजबूत करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe