देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे आमदार आशुतोष काळे यांचा विजयाचा मार्ग सोपा होणार !

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी बाजी मारली होती. काळे यांनी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांचा दारुण पराभव केला होता. सध्या काळे आणि कोल्हे महायुतीचा भाग आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ashutosh Kale News

Ashutosh Kale News : काल निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील असेचं चित्र आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी बाजी मारली होती. काळे यांनी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांचा दारुण पराभव केला होता. सध्या काळे आणि कोल्हे महायुतीचा भाग आहेत.

गेल्यावेळी काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता. तसेच, यंदा विवेक कोल्हे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आणला आहे. म्हणजे ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला ती जागा असा हा महायुतीचा फॉर्म्युला आहे.

यानुसार कोपरगावची जागा यावेळी महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या अजितदादा गटाकडे जाण्याची शक्यता आहे. ही जागा अजितदादा गटाला जाईल आणि येथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार आशुतोष काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते.

अजून काळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र अजितदादा गटाकडून काळे यांनाच उमेदवारी मिळणार अशा चर्चा आहेत. यामुळे मात्र कोल्हे यांची महायुतीमध्ये कोंडी होत आहे. हेच कारण आहे की कोल्हे कुटुंब भाजपामधून बाहेर पडणार आणि शरद पवार गटात जाऊन काळे यांना आव्हान देणार अशा चर्चांना मध्यंतरी ऊत आला होता.

पण, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तयार झालेला हा पेचप्रसंग सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरले आहेत. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात भेट झाली होती.

शरद पवार आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकत्रित प्रवासही केला होता. यामुळे कोल्हे शरद पवार गटात जाणार आणि हाती तुतारी घेऊन आशुतोष काळे यांच्या विरोधात उभे राहणार अशा चर्चांनी जोर पकडला होता.

मात्र अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना चर्चेसाठी बोलावणं पाठवलं होतं. दरम्यान स्नेहलता कोल्हे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच मुंबईत चर्चा झाली आहे.

मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणताच तपशील समोर आलेला नाही. पण, महायुती मधील मित्र पक्षांची कोंडी होऊ नये यासाठी फडणवीस आणि स्नेहलता कोल्हे यांच्यात झालेली ही चर्चा महत्वपूर्ण समजली जात आहे.

दरम्यान फडणवीस यांनी या भेटीदरम्यान कोल्हे कुटुंबाने वेगळा निर्णय घेऊ नये याबाबतच स्नेहलता कोल्हे यांच्यासोबत संवाद साधला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीनंतर कोल्हे कुटुंबाने वेगळी भूमिका घेतली नाही तर विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचा विजयाचा मार्ग आणखी सोपा होणार आहे.

जर कोल्हे भाजपामध्येचं राहिलेत तर प्रथमच कोपरगावात काळे आणि कोल्हे सोबतच प्रचारात दिसू शकतात. या निमित्ताने प्रथमच कोपरगावात काळे आणि कोल्हे कुटुंब एकत्रित महायुतीचा प्रचार करताना दिसतील. तथापि, कोल्हे कुटुंब आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe