Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून आता साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते.
अहिल्यानगर जिल्ह्यातही सध्या अशीच परिस्थिती दिसत आहे. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा अधिक काटेदार होणार असे चित्र तयार होत आहे.
कारण की संगमनेर विधानसभा मतदारसंघातून यंदा महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुजय विखे पाटील हे उमेदवारी करतील अशा चर्चा सुरू आहेत. स्वतः डॉक्टर विखे पाटील आणि त्यांचे पिताश्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील तसेच संकेत दिले आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला. ते सलग आठ टर्म पासून म्हणजेच 40 वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी मात्र थोरात यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात डॉक्टर सुजय विखे पाटील हे आव्हान देणार आहेत.
दरम्यान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना पुन्हा आव्हान दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.
यावेळी सुजय विखे पाटील यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावण्याची कदाचित ही तुमची पहिलीच वेळ असावी असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना सुजय विखे पाटील यांनी पहिल्यांदाच मेळाव्याला येत नाहीये, मित्रा मी गेल्या अनेक वर्षांपासून या मेळाव्याला येतोय.
या कार्यक्रमासाठी मी आणि माजी आमदार कर्डिले साहेब कोणाचेही आमंत्रण स्वीकारत नाही. मी मुंडे समर्थक म्हणून इथं आलो आहे. मुंडे साहेबांचा फार मोठा आशीर्वाद माझ्यावर राहिला आहे आणि म्हणून वर्षानुवर्ष आम्ही ही परंपरा पाळलेली आहे.
स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल असणारा आदर, पंकजाताई बद्दलचा आदर यामुळे आम्ही येथे येतो. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी जेव्हा जात धर्म राजकारणात येईल तेव्हा महाराष्ट्र उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. माझा पराभव देखील जात अन धर्माच्या राजकारणामुळे झालाय.
पण जर असं सुरू राहिलं तर आमच्यासारख्या सुशिक्षित माणसाच राजकारणात कामच नाही. आम्ही आमचा व्यवसाय, प्रपंच चालू ठेवू शकतो. मात्र जर जातीच आणि धर्माचे राजकारण असेच सुरू राहिलं तर महाराष्ट्र बिहारच्या मागे जाईल असं माझं मत असल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी पत्रकारांनी सुजय विखे पाटील यांना बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल सुद्धा प्रश्न विचारला. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये माझ्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मी निवडून येतो. विशेषता मोठा उमेदवार असला तर अधिक फरकाने निवडून येतो असे विधान केले होते.
म्हणजे थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान याबाबत बोलताना सुजय विखे म्हणालेत की, ते मला मोठे उमेदवार म्हणाले आहेत, हे तुमच्या लक्षात आले नाही असं म्हणत त्यांचा चिमटा काढला.
तसेच, ते म्हणजेच आमदार बाळासाहेब थोरात हे सध्या स्वप्नात आहेत पण आम्ही त्यांचे लवकरच स्वप्न भंग करू असं म्हणत संगमनेर मधून यावेळी निवडणूक लढवणार असे स्पष्ट करत बाळासाहेब थोरात यांना पुन्हा एकदा आव्हान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे यंदाची संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक काटेदार होणार असे चित्र तयार होत असून यंदाच्या निवडणुकीत संगमनेर मध्ये नेमकं काय घडणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.