आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 41 कोटी रुपये मंजूर ! कोणत्या रस्त्यांची कामे होणार ? पहा..

Balasaheb Thorat News : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. गेल्या आठ विधानसभा निवडणुकींपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी जवळपास 41 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती हाती आली आहे.

थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. इंद्रजीत यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 40 कोटी 73 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या मंजूर निधी मधून तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. खरे तर गेल्या 40 वर्षांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. विविध विकास कामांमुळे संगमनेर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या आदर्शवत तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

संगमनेर तालुक्याच्या विकासात गेल्या चार दशकापासून बाळासाहेब थोरात हे मोलाची योगदान देत असून त्यांनी केलेल्या कृषी, शिक्षण, पर्यटन, उद्योग आदी क्षेत्रांमधील नेत्र दीपक कामगिरी त्यांना संगमनेर चे सर्वात लोकप्रिय नेतृत्व बनवते.

बाळासाहेब थोरात हे एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. ते संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच शासनासोबत झगडत असतात. दरम्यान थोरात यांच्या याच पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्याच्या रस्त्यांच्या कामासाठी आता 40 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत आता आपण सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील कोणकोणत्या रस्त्यांची कामे पूर्ण होणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तालुक्यातील कोणत्या रस्त्यांची कामे होणार ?

या अंतर्गत डिग्रस ते रणखांबवाडी रस्ता ३ कोटी ५३ लाख रूपये
चिखली ते जवळेकडलग रस्ता ६ कोटी ३२ लाख रूपये
खरशिंदे ते खांबे रस्ता २ कोटी ४६ लाख रूपये
मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द रस्ता ५ कोटी ६७ लाख रूपये
पारेगांव खुर्द-तिगाव ते वडझरी खुर्द रस्ता ६ कोटी १ लाख रूपये
साकुर ते बिरेवाडी रस्ता ४ कोटी ८२ लाख रूपये
शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता ४ कोटी १६ लाख रूपये
तासकरवाडी ते खंडेरायवाडी रस्ता ७ कोटी ७६ लाख रूपये