Balasaheb Thorat News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करत आहेत. दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे.
खरंतर यंदाची विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे, कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात जागा वाटपावेळी मुख्यमंत्री पदाबाबत देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला.
महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर शिवसेना ठाकरे गटाने सातत्याने आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे म्हणत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहेत असे वारंवार सांगितले.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे सरकार आल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या बाजूने आहेत. अशातच मात्र आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांचे एक विधान चर्चेत आले आहे.
या विधानामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? या शांत झालेल्या चर्चांना पुन्हा ऊत येण्याची शक्यता आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार यांनी एक मोठे विधान केले.
त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचाराच्या सभेत बोलताना बाळासाहेब थोरातांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातात राज्य दिले तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
पवार म्हणाले की, शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर थोरातांना तुम्ही आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. आता मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तेथे आहेत. राज्याचा कृषिमंत्री म्हणून देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी सर्वोत्तम काम केले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही शरद पवार यांच्या सभा झाल्या. ज्यांनी साथ सोडली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष बाब म्हणजे घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
थोरात यांनी, प्रभावती घोगरे व माझ्यावर लवकरच भाषणबंदी येणार असल्याची शक्यता आहे. तशा हालचाली निवडणूक आयोगाकडे सुरू झाल्या आहेत. या भागात गुलामीचे राजकारण चालू आहे, असं म्हणतं नाव न घेता विखे पाटील यांच्यावर टिका केली.