Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागल आहे ते विधानसभा निवडणुकांचे. सारेजण विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय निवडणूक आयोग पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील मागे असेच संकेत दिले होते. ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेतल्या जात आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लावले आहे.
खरे तर अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेची तयारी सुरू केली होती. आता याचं तयारीला अधिक गती मिळाली आहे. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या सभा, मिळावे आणि आढावा बैठकांच्या माध्यमातून एका प्रकारे प्रचाराला सुरुवात झाली आहे.
राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून राज्यभरात दौरे सुरू असून याच दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती तयार होत आहे. एकीकडे महायुतीने यंदाची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरणार असे स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण राहणार या संदर्भात काहीच ठरलेले दिसत नाही. मात्र उबाठा शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणि काँग्रेसला आवाहन करत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो, असे आवाहन केले होते. उबाठा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेकदा उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील असे म्हटले आहे.
दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोणीच नसल्याचे म्हटले आहे. अशातच, आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण राहणार या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक मोठे विधान केले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हा निहाय आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री पदा संदर्भात मोठे विधान केले आहे. बाळासाहेब थोरात यांनी, “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगलं काम करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो.
मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे”, असं विधान करून मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल अशी भूमिका जाहीर केली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून धुसफूस असल्याचे जग जाहीर झाले आहे.