काकडे यांच्या वडिलोपार्जित संघर्षाची जाण ठेवत विधानसभेत त्यांच्या पाठीशी राहा ; सिनेअभिनेते अनासपुरे यांचे आवाहन

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : मागील तीन दशकांपासून काकडे दाम्पत्य पाणी प्रश्नावर लढत आहे. चांगले काम करणाऱ्यांवर टीका होते. गोड फळाच्या झाडालाच लोक दगड मारत असतात. मतदारांनी पैशाची नाही तर मतदानाची टक्केवारी वाढवावी.

वर्षानुवर्षे तालुका दुष्काळी आहे, पण गावागावांत पाणी नेण्यासाठी ही माणसे प्रामाणिकपणे संघर्ष करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आता तुम्ही साथ देण्याची गरज आहे. कारण त्यांचा हा वडिलोपार्जित संघर्ष केवळ तुमच्यासाठी चालला आहे.

याची एवढीच जाणीव ठेवा, त्यांच्या आतापर्यंतच्या कामाचे फळ त्यांना देण्यासाठी आगामी विधानसभेसाठी त्यांच्या पाठीशी बळ उभे करा. असे आवाहन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

जनशक्ती विकास आघाडी आयोजित, खंडोबामाळ येथे गुरुवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील ताजनापूर टप्पा क्रमांक २ च्या लढ्यातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

हर्षदा काकडे यांनी घुले यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने विकासाची कामे केली. वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या साखर सम्राट कारखानदारांनी तालुक्यासाठी काय केले? त्यांना हवे असणारे परिवर्तन म्हणजे आमच्याच घरातील नव्या उमेदवारास संधी द्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समिती सभापतीपद असूनही त्यांना विकास साधता आला नाही.

राजकीय पोळी भाजण्यासाठी या लोकांनी समाजात, जातीपातीमध्ये भांडणे लावली, त्यामुळे दंगल घडली. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. त्यांना अध्यक्षपदाच्या वेळी पाठिंबा दिल्याचा आज पश्चाताप होतो. त्यांनी अडीच वर्षात केवळ आपलाच विकास साधला.

या काळात बिगर टक्केवारी शिवाय एकही काम झाले नाही. कोणाचाही नामोल्लेख न करता विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आता काहीही झाले तरी थांबायचे नाही, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणण्यासाठीनिवडणूक लढण्याचा वज्र निर्धार काकडे यांनी केला.

ऍड. काकडे म्हणाले, आलटून पालटून तीनही घराण्यांना मतदारांनी सत्ता दिली, साखर कारखाने दिले. मात्र त्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले. जनतेने ठरवले तर भल्याभल्याची जनता जिरवते ,याची पुनरावृत्ती तालुक्यात घडणार आहे.

तालुक्यातील जनतेचा त्याग लक्षात आणून देत, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसीसंदर्भात मागणी केली. त्यांनीही तत्काळ दखल घेऊन बैठका घेतल्या, मात्र, मंजुरीच्या वेळी या प्रश्नात खोडा घालून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या स्वप्न धुळीस मिळवल्याचे काकडे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe