Bhagat Singh Koshyari : सध्या राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
यावेळी पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलवणं म्हणजे राज्यापालांनी सरकार पाडण्याला हातभार लावणं, असे म्हणावे लागेल. राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहायला हवं, अशा शब्दात तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्हाला या सर्व गोष्टींची काळजी वाटते, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केली. तसेच तीन वर्ष सुखाने संसार केला मग एका रात्रीत असं काय घडलं, ज्यामुळे तीन वर्षांचा संसार मोडला. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते.
दोघांकडे मिळून ९७ आमदार आहेत. तो देखील मोठा गट होता. शिवसेनेच्या ५६ पैकी ३४ आमदारांनी सरकारवर किंवा नेतृत्वावर अविश्वास दाखवला. त्यामुळे तीन पक्षांपैकी एका पक्षात मतभेद झाल्यानंतरही इतर दोन पक्ष आघाडीत कायम होते.
त्यावेळी राज्यपालांनी ही गोष्ट का लक्षात घेतली नाही? आमदारांची सरकारविरोधी भूमिका किंवा पक्षनेतृत्वाशी मतभेद सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरात झाले नाहीत. हे सगळं तीन वर्षांनंतर घडलं. त्यामुळे अचानक एक दिवस त्या ३४ जणांना वाटल की काँग्रेस-राष्ट्रवादीशी मतभेद आहेत. असे कस काय होऊ शकतं? असेही ते म्हणाले.