Maharashtra Politics : शेतकऱ्यांना फसवी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारची वृत्ती सूड भावनेची असून या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. ही बाब धक्कादायक असल्याचा घणाघात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला. चाकण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या चक्का जाम आंदोलनात ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणाची टांगती तलवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ठेवून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अनेक वेळा आर्थिक संकटात ढकलले आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यात शुल्क लावून अप्रत्यक्ष कांदा निर्यातबंदीद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी देऊन उदासीनतेचे धोरण कायम ठेवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
कांद्याला उत्पादन खर्चाची निर्धारित किंमत निश्चित करून त्यापेक्षा अधिक दर मिळण्याची मागणी पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. शासनाने किमान उत्पादन खर्चाची किंमत निर्धारित करून त्यापुढे खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे आवश्यक आहे.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, उन्हाळी कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भविष्यात कांद्याचे दर वाढतील, या मोठ्या अपेक्षेने कांद्याची साठवणूक केली; परंतु मोठा खर्च करूनही कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.