१४ जानेवारी २०२५ संगमनेर : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत जनतेची फसवणूक आणि बेनामी करून बहुमत मिळवत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे.तुम्ही महाराष्ट्रात कुठे ही फिरले तरी जनतेच्या मनात अजिबात उत्साह किंवा चेहऱ्यावर आनंद दिसत नाही.
सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारनेच खेडेगावातील रोजगार संपवून खेडे भकास केली आहेत.अन् आता हेच म्हणतात की खेड्याकडे चला,अशी जोरदार टीका विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी संगमनेरात पत्रकारांशी बोलताना केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रेरणा दिनानिमित्त रविवारी आमदार वडेट्टीवार संगमनेरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील लोकांना हिंदुत्व सांगून आणि बनवाबनवी करून हे महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे.परंतु यांनीच ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगार केले.शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आगामी महानगरपालिका अन् स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल या वक्तव्यावर आमदार वडेट्टीवार यांना छेडले असता ते म्हणाले, याबाबत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.
ते काय बोलले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.राज्यात महाविकास आघाडी टिकली पाहिजे आणि सर्व आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढली पाहिजे, असे आमचे मत आहे.अजूनही महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीची वाट पाहत आहे.
ते काही बोलले असतील तर आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करून आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्यातून मार्ग काढू अन् महाविकास आघाडी टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करू,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.